महिलांना 50 टक्के सवलत पण मूलभूत सुविधांचा पत्ताच नाही , नगरमधील परिस्थिती

शेअर करा

शिंदे सरकारने महिलांना एसटी प्रवासात 50 टक्के तिकीट केल्यानंतर लालपरीचा वापर करून प्रवास करणाऱ्या महिलांची संख्या वाढलेली पाहायला मिळत आहे अशातच सध्या सुट्ट्यांचे दिवस असल्याने बस स्टैंडवर मोठ्या प्रमाणात गर्दी सुरू झालेली असून त्या तुलनेत बस स्टॅन्डवरील पायाभूत सुविधा अत्यंत कमकुवत आणि तोकड्या पडत आहेत. त्यासाठी कुठलीही उपाययोजना करण्यात आलेली नसल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.

नगर शहरातील पुणे बसस्टॅन्ड इथे अशीच परिस्थिती असून रात्री अकराच्या सुमारास देखील मोठ्या प्रमाणात बस स्थानकावर महिला आणि वृद्ध पुरुष तसेच लहान मुलांची देखील प्रचंड आबाळ पहायला मिळते आहे. नगर जिल्ह्यातून पुण्यात प्रवास करणाऱ्या सर्वाधिक नागरिकांची संख्या या बसस्थानकावर असते त्यामुळे एसटी महामंडळाला मोठ्या प्रमाणात आर्थिक उत्पन्न देखील पुणे बस स्टॅन्डवरून मिळते मात्र त्या तुलनेत बसण्यासाठी म्हणून अवघी 25 बाकडी आढळून आली तर काही बाकडी ही तुटलेल्या अवस्थेत एका बाजूला पडलेली आहेत तर स्वछतेची देखील दयनीय परिस्थिती आहे .

प्रतिनिधीने पाहणी केली त्यावेळी बस स्टैंडवर अक्षरशः फलाटावर नागरिक बसलेले आढळून आले सोबतच फलाटाच्या समोर जिथे गाडी लावली जाते तिथे अनेक नागरिक उभे राहिलेले होते त्यामुळे वेगाने येणारी एसटी पार्क करण्यासाठी देखील चालकाला मेहनत करावी लागत होती ज्यामुळे अपघाताचा देखील धोका निर्माण झालेला आहे . लालपरीचा वापर करण्याचे प्रमाण वाढलेले असले तरी बसस्थानकावर येणाऱ्या महिला, वृद्ध पुरुष आणि नागरिकांसाठी पायाभूत असलेल्या सुविधा अत्यंत कमकुवत असल्याचे दिसून येत आहे.


शेअर करा