
सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून एका लहान चिमुरड्याचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे . ‘ माझ्या पप्पांनी गणपती आणला ‘ या गाण्यावर हा व्हिडिओ बनवलेला असून त्याच्या या व्हिडिओची सध्या सोशल मीडियात जोरदार चर्चा आहे . आपल्या गोड चेहऱ्याने आणि हावभावाने त्याने नेटकर्यांची मने जिंकलेली असून अनेक राजकीय नेत्यांना देखील या व्हिडिओची भुरळ पडलेली आहे. राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी देखील या चिमुरड्याचे कौतुक केलेले आहे.
‘ माझ्या पप्पांनी गणपती आणला ‘ या गाण्यावर इंस्टाग्राम रिल्सवर त्याने जो काही परफॉर्मन्स दिलेला आहे तो अप्रतिम आहे . आपल्या चेहऱ्यावरील गोड भाव आणि त्याची निरागसता सध्या सर्वांनाच मोहिनी घालत आहे. साईराज केंद्रे असे या चिमुरड्याचे नाव असून गणेश केंद्रे या इंस्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आलेला आहे. साईराज अवघ्या चार वर्षांचा असून अवघ्या दीड वर्षांपासून त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर त्याच्या कुटुंबीयांकडून शेअर करण्यात येतात. साईराज हा बीड जिल्ह्यातील कान्हेरवाडी गावचा रहिवासी असून सध्या तो अनुराधादेवी इंग्लिश हायस्कूलमध्ये शिकतो आणि त्याच शाळेच्या युनिफॉर्मवर त्याने माझ्या पप्पांनी गणपती आणला हा व्हिडिओ बनवलेला आहे. साईराजचे वडील गणेश केंद्रे हे त्याचे व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर शेअर करत असतात.
साईराज याचे कुटुंबीय या आधीपासून म्हणजेच साईराज अवघ्या दीड वर्षाचा असल्यापासून tiktok वर त्याचे व्हिडिओ शेअर करत होते . tiktok देशातून हद्दपार झाले त्यानंतर त्यांनी इंस्टाग्रामवर त्याचे व्हिडिओ पोस्ट करण्यास सुरुवात केली मात्र tiktok वरील काही व्हिडिओ देखील त्यांनी अद्यापपर्यंत स्वतःकडे जपवून ठेवलेले आहेत याआधी देखील साईराजचा ‘ आई मला पावसात जाऊ दे ‘ हा व्हिडिओ जोरदार व्हायरल झालेला होता.
माझ्या पप्पांनी गणपती आणला हे गाणे पाहिल्यानंतर साईराज याने या गाण्यावर स्वतःचे रिल्स बनवण्याचा वडिलांकडे आग्रह केला आणि त्याच्या वडिलांनी अवघ्या दोन दिवसात हा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर टाकला आणि त्यानंतर हा व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला . लहानशा साईराजचे सध्या जोरदार कौतुक केले जात असून मूळ गाण्यापेक्षा देखील जास्त प्रमाणात हा व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचलेला आहे.