
महाराष्ट्रात एक अत्यंत खळबळजनक अशी घटना मुंबईतील मरीन ड्राईव्ह येथील एका शासकीय वसतिगृहाच्या खोलीत समोर आलेली असून एका विद्यार्थिनीचा नग्न अवस्थेतील मृतदेह आढळून आलेला आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि तपास पंचनामा सुरू असताना याच ठिकाणी काम करत असलेल्या एका सुरक्षारक्षकाचा देखील मृतदेह ग्रँड रोड ते चरणी रोड स्थानकादरम्यान आढळून आलेला आहे . सदर विद्यार्थिनीवर त्याने अत्याचार करून त्यानंतर आत्महत्या केली असल्याची प्राथमिक माहिती आहे.
उपलब्ध माहितीनुसार , ओमप्रकाश कनोजिया ( वय ३५ ) असे मयत नराधम सुरक्षारक्षकाचे नाव असून त्याचा मृतदेह रेल्वे रुळावर सापडलेला होता. मयत विद्यार्थीनीवर त्याने बलात्कार केला आणि त्यानंतर त्याने आत्महत्या केली असावी अशी प्राथमिक माहिती असून मयत मुलीचे वडील हे पत्रकार आहेत. सदर अठरा वर्षांची विद्यार्थिनी ही मूळची अकोला येथील असून सावित्रीबाई फुले वसतीगृहात राहत होती. वांद्रे येथील एका नामांकित कॉलेजमध्ये पॉलिटेक्निकच्या दुसऱ्या वर्गात तिचे शिक्षण सुरू होते.
मंगळवारी दुपारी तिचा विवस्त्र अवस्थेतील मृतदेह वसतीगृहाच्या चौथ्या मजल्यावरील पोलीस सापडला. मरीन ड्राईव्ह पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले त्यावेळी खोलीला बाहेरून कुलूप होते. पोलिसांनी दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला त्यावेळी दोन बेडच्यामध्ये विवस्त्र अवस्थेत तिचा मृतदेह आढळून आला. मुलीच्या घरचे तिला सकाळपासून फोन करत होते मात्र ती फोन उचलत नसल्याने मैत्रिणीकडे विचारणा केली त्यावेळी बाहेरून कुलूप असल्याने त्यांनाही व्यवस्थित माहिती मिळाली नाही. दुपारी चार ते पाचच्या दरम्यान पोलिसांना याप्रकरणी माहिती देण्यात आली आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले होते.
सदर विद्यार्थिनी ही दोन ते तीन दिवसात ती घरी जाणार होती. सुट्टी असल्याकारणाने बहुतांश विद्यार्थिनी आपापल्या घरी गेलेल्या होत्या आणि ती देखील घरी जाणार होती. तिथे काम करत असलेला ओमप्रकाश कनोजिया याची नजर चांगली नव्हती असे होस्टेलमधील विद्यार्थिनींनी बोलून दाखवलेले असून मयत विद्यार्थिनी हीने देखील तिच्या एका मैत्रिणीला घटना घडली त्याच्या आदल्या दिवशी सुरक्षारक्षक याच्यापासून भीती वाटत असल्याकारणाने एका मैत्रिणीला तिच्या रूमवर मुक्कामाला येण्याची विनंती केली होती मात्र या मैत्रिणीने नकार दिला आणि त्यानंतर हा दुर्दैवी प्रकार घडला. सुरक्षारक्षक याने याआधी देखील अनेक मुलींच्या रूममध्ये घुसण्याचा प्रयत्न केलेला होता मात्र त्याच्या विरोधात तक्रार देऊनही कारवाई झाली नाही त्यानंतर ही घटना घडलेली आहे.