मुलीला नांदवतो का नाही ? , पोलीस सासऱ्याने घेतला जावयाचा जीव

शेअर करा

क्रूरतेचा कळस गाठणारी एक घटना महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्यात समोर आलेली असून आपल्या मुलीला घटस्फोट देण्याच्या तयारीत असलेल्या जावयाला हवालदार असलेल्या एका सासऱ्याने आपल्या नातेवाईकांसोबत गंभीर मारहाण केली. लोखंडी रॉड काठी आणि लाथा बुक्क्यांनी जावयाच्या घरात घुसून केलेल्या मारहाणीत हा जावई गंभीर जखमी झाला आणि अखेर त्याचा रुग्णालयात मृत्यू झालेला आहे.

तक्रारदार असलेले सचिन अनिल पतंगराव यांनी या संदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवलेला असून नितीन पतंगराव असे मयत जावयाचे नाव आहे. दोन वर्षांपूर्वी त्याचा विवाह या प्रकरणातील आरोपी असलेला हवालदार महेश शेजेराव याच्या मुलीसोबत झालेला होता. नितीन आणि त्याच्या पत्नीचे लग्नानंतर कधीच पटले नाही म्हणून अखेर ती माहेरी राहायला गेलेली होती. आरोपी असलेला हवलदार महेश शेजेराव , हर्षवर्धन शेजेराव , श्रीकांत कोळी ( सर्वजण राहणार सोलापूर ) यांच्यासोबत या प्रकरणात इतर दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

सोलापूर शहर पोलीस दलात कार्यरत असलेले महेश शेजेराव, हर्षवर्धन शेजेराव, श्रीकांत कोळी ते तीन जण जावई नितीन पतंगराव याच्या घरी जाब विचारण्यासाठी गेले होते. यावेळी जावई व सासऱ्यात कडाक्याचे भांडण झाले आणि भांडणाचे पर्यवसान हाणामारीत झाले. मारहाणीत सासरा महेश शेजेराव, मेहुणा हर्षवर्धन शेजेराव, श्रीकांत कोळी आणि सोबत असलेल्या इतर लोकांनी नितीन याच्या डोक्यात लोखंडी रॉडने जबर प्रहार केला आणि त्यानंतर लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. जावई रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडल्यावर सासऱ्याने तिथून पळ काढला होता त्यानंतर नितीन पतंगराव यांचा मृत्यू झालेला होता.


शेअर करा