
महाराष्ट्र पोलीस दलात खळबळ उडून देणारी एक घटना औरंगाबाद येथे समोर आलेली होती. एसीपी पदावर कार्यरत असलेला विशाल ढुमे याने सहकारी असलेल्या एका व्यक्तीच्या पत्नीच्या पाठीला गाडीत स्पर्श केला आणि त्यानंतर त्याच्या घरी जाऊन देखील बेडरूमचे बाथरूम वापरून द्यावे म्हणून आग्रह केला. दारूच्या नशेत असलेला विशाल ढुमे याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली होती त्यानंतर तात्काळ सहा तासात जामीन देखील मंजूर झाला मात्र अखेर नागरिकांच्या रोषापुढे नमते घेत गृह विभागाने त्याच्या निलंबनाचे आदेश काढलेले आहेत. विशाल ढुमे हा गोंधळ घालत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्याच्या विरोधात कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी खासदार इम्तियाज जलील यांनी केलेली आहे. त्याचे निलंबन केले नाही तर 20 जानेवारी रोजी औरंगाबाद बंदचा देखील इशारा खासदार इम्तियाज जलील यांनी दिलेला होता त्यानंतर ही कारवाई करण्यात आलेली आहे .
काय आहे प्रकरण ?
सहाय्यक पोलीस आयुक्त असलेले विशाल ढुमे यांच्यावर चक्क विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. आपले सहकारी असलेल्या व्यक्तीच्या पत्नीच्या पाठीवरून त्यांनी दारूच्या नशेत हात फिरवत महिलेचा विनयभंग केला आणि त्यानंतर मित्रासोबत त्याच्या घरी गेल्यानंतर देखील त्याच्या पत्नीसोबत आक्षेपार्ह असे वर्तन केले असे त्यांच्यावर आरोप आहेत.शनिवारी मध्यरात्रीनंतर अडीचच्या सुमारास हा सगळा धक्कादायक प्रकार घडला असून या प्रकरणी ढुमेंविरोधात विनयभंगासहीत बळजबरीने घरात घुसल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला होता .
पीडित महिला तिच्या पती आणि मुलीबरोबर एका रेस्टॉरंटमध्ये डिनरसाठी गेली होती त्यावेळी विशाल ढुमे त्यांच्या मित्रांसोबत याच रेस्तराँमध्ये आले. पीडिता आणि ढुमे एकमेकांना आधीपासूनच ओळखत होते त्यावेळी आपल्याकडे गाडी नाही म्हणून विशाल ढुमे यांनी महिलेच्या घरी सोडण्याची विनंती केली. रात्री पावणेदोन वाजता हे सर्वजण एकत्र घरी जाण्यासाठी निघाले तेव्हा पीडित महिला तिच्या मुलीसहीत पुढल्या सीटवर बसली होती तर ढुमे या महिलेच्या मागच्या सीटवरच बसले होते. गा़डी सुरु झाल्यानंतर काही वेळातच ढुमेंनी या महिलेबरोबर अश्लील चाळे सुरु केले आणि एवढ्यावरच थांबले नाहीत तर ते पीडितेच्या घरात बळजबरीने घुसले. घरी जाताच त्यांनी या पीडितेच्या बेडरुममधीलच शौचालय वापरण्याचा आग्रह करत वाद घातला आणि महिलेच्या सासूबरोबरच पतीलाही शिवीगाळ केली आणि त्यानंतर पीडितेच्या पतीने पोलिसांना बोलावलं आणि पोलिस घटनास्थळी तात्काळ दाखल झाले अन गुन्हा नोंदवण्यात आला .
पोलीस आयुक्त डॉ. गुप्तांनी ढुमेंची तडकाफडकी बदली केली असून नियंत्रण कक्षात ढुमेंची बदली करण्यात आली होती . प्रकरणाचा अहवाल गृह मंत्रालयाला पाठवण्यात आला असून विशाल ढुमेंना निलंबित करायचं की नाही यासंदर्भातील निर्णय गृह मंत्रालयातूनच घेतला जाईल असं एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटलं होते तर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनीही ढुमेला निलंबित करण्याची मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे केली होती त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे .
विशाल ढुमे काही काळ अहमदनगर येथे देखील वरिष्ठ पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत होते. कोरोना काळात देखील त्यांची कारकीर्द वादग्रस्त राहिलेली होती तर बनावट डिझेल प्रकरणात तपास त्यांच्याकडून काढून संदीप मिटके यांच्याकडे सोपवण्यात आला होता. सहकारी कर्मचाऱ्यांसोबत तसेच नागरिकांसोबत देखील त्यांचे गैरवर्तन त्यावेळी चर्चेत आलेले होते आणि त्यानंतर त्याची बदली झाली.