मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन आत्महत्या , शरद पवार पोहचले शेतकऱ्याच्या घरी

शेअर करा

काही दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्यातील एका शेतकऱ्याने पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देऊन आत्महत्या केली होती. मोदी यांच्या वाढदिवसाचा उत्सव गोदी मीडियाकडून सुरू असताना या दुर्दैवी प्रकाराकडे मात्र बहुतांश माध्यमांनी कानाडोळा केलेला होता. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी या शेतकऱ्याच्या घरी दाखल होत कुटुंबाची भेट घेत त्यांचे सांत्वन केले आहे. शरद पवार यांनी मयत शेतकऱ्याच्या फोटोचे दर्शन देखील घेतले.

कांद्याला हमी भाव मिळत नाही म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा दिल्यानंतर या शेतकऱ्यांने आत्महत्या केली होती. दशरथ केदारी असे या शेतकऱ्याचे नाव असून मृत्यूपूर्वी त्यांनी सुसाईड नोट देखील लिहून ठेवलेली होती. केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाची झळ आता ग्रामीण पातळीवर अनेक शेतकऱ्यांना भासत असून त्यातूनच दशरथ केदारी यांच्यासारखे शेतकरी आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतात अशा आत्महत्या दुर्दैवी आहेत. मयत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारने योग्य ती मदत करून त्यांचे पुनर्वसन करावे. शेतकरी हा लाखाचा पोशिंदा आहे त्याचा सन्मान राखण्याची प्रत्येकाची जबाबदारी आहे, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

शरद पवार यांनी यावेळी केंद्र आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांकडे त्वरित लक्ष देऊन प्राधान्यक्रमाने हे प्रश्न सोडवणे अपेक्षित आहे. शेतकऱ्यांवर अशी वेळ येऊ नये याची काळजी घेणे गरजेचे आहे असे देखील पवार पुढे म्हणाले. शरद पवार यांच्या या भेटीनंतर सामान्य शेतकऱ्याच्या घरी भेट देणारे शरद पवार यांचे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात कौतुक केले जात आहे.


शेअर करा