
राज्यात सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर वातावरण प्रचंड तापलेले असताना दुसरीकडे सोलापूर इथे धनगर आरक्षण कृती समितीच्या एका कार्यकर्त्याने मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अंगावर भंडारा उधळलेला आहे. सदर घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झालेला असून राधाकृष्ण विखे पाटील यांनी याप्रकर सदर कार्यकर्त्यांवर कुठलाही गुन्हा दाखल करू नये असे आदेश दिलेले आहेत.
शेखर बंगाळे असे या कार्यकर्त्याचे नाव असून सोलापूरच्या विश्रामगृहावर राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेण्यासाठी म्हणून ते आलेले होते. शेखर यांनी विखे पाटलांना आपल्याला धनगर आरक्षणाचे निवेदन द्यायचे आहे असे सांगितले म्हणून पोलिसांनी विखे पाटलांना भेटण्याची परवानगी दिलेली होती. विखे पाटलांनी ठरल्याप्रमाणे शेखर बंगाळे यांच्याकडून निवेदन स्वीकारले आणि ते हे निवेदन वाचत असतानाच शेखर बंगाळे यांनी खिशातून भंडाऱ्याने भरलेला रुमाल काढला आणि विखे पाटलांच्या डोक्यावर भंडारा उधळला त्यानंतर काही कार्यकर्त्यांनी येळकोट येळकोट जय मल्हारच्या देखील घोषणा दिल्या.
राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांचे अंगरक्षक आणि समर्थक यांनी तात्काळ शेखर बंगाळे यांना पकडले आणि त्यानंतर पोलिसांच्या ताब्यात दिले. राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना , ‘ भंडारा पवित्र मानला जातो त्यामुळे मला आशीर्वाद मिळालेला आहे असे समजून मी आनंद मानतो. शेखर बंगाळे यांच्या विरोधात काहीही गुन्हा दाखल न करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत मात्र अचानकपणे हा प्रकार घडल्यामुळे माझ्या काही कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण केली त्यामुळे मी देखील कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन करतो , ‘ असे म्हटलेले आहे.
गोपीचंद पडळकर म्हणाले की , ‘ मल्हारी मार्तंडाचा बिरोबाचा भंडारा हा समस्त बहुजन समाजासाठी आज त्याचे आणि श्रद्धेचे प्रतीक आहे. त्याचा आंदोलनासाठी वापर करणे हे अत्यंत अयोग्य असून काही लोकांनी विखे पाटलांवर भंडारा उधळला असेल तर मी विखे पाटलांना विनंती करतो की खंडोबाचा बिरोबाचा आशीर्वाद समजून त्यांनी तो कपाळाला लावावा तसेच माझ्या समस्त बंधू भगिनींना मी आवाहन करतो की ह्या लांडगा काकाच्या नादाला लागू नका ‘,
गोपीचंद पडळकर पुढे म्हणाले की , ‘ आपण धनगर आरक्षणाची लढाई कायदेशीररित्या मुंबई उच्च न्यायालयात लढत आहोत त्याबाबत वेळोवेळी जे मागितले ते सर्व सहकार्य देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आपल्याला मिळत आहे आणि आम्हाला खात्री आहे की मल्हारी मार्तंड खंडोबा नक्कीच आपल्याला यश देईल ‘ असे देखील ते पुढे म्हणाले.