शेठ माव्यावर करोडपती , तरुणाईला व्यसनांध करणाऱ्यांवर कारवाई कधी ?

शेअर करा

राज्य सरकारने जुलै 2012 सालापासूनच महाराष्ट्रात गुटखाबंदीचा निर्णय घेतलेला आहे. सरकारी कार्यालयात तसेच सरकारी मालमत्ता असलेल्या अनेक ठिकाणी कोपऱ्याकोपऱ्यात मारलेल्या पिचकाऱ्या अन व्यसनांध झालेले तरुण असे काहीसे चित्र त्या काळात महाराष्ट्रात होते मात्र त्यानंतर या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात मात्र सर्वच सरकारने तितकेसे गांभीर्य दाखवलेले नाही. सत्ता कुणाचीही असली तरी राज्यात सहजासहजी गुटखा उपलब्ध होतो असे चित्र 2012 पासूनच राज्यात आहे.

शाळा आणि महाविद्यालय परिसर असलेल्या ठिकाणावरील दुकानांमध्ये गुटका विक्रीस बंदी आहे मात्र तरीदेखील गुटख्याची टेबलाखालून सर्रास विक्री होत असून अशा प्रकारच्या अवैध धंद्यांवर पोलीस आणि अन्न आणि औषध प्रशासन विभाग कठोर कारवाई कधी करणार ? असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित केला जात आहे. नगर शहर आणि जिल्ह्यात गुटख्याला पर्याय म्हणून मावा गेल्या कित्येक वर्षांपासून धुमाकूळ घालत असून यावर मात्र फारसे निर्बंध नसल्याने माव्यामध्ये कुठलेही पदार्थ कालवून चक्क तरुणांच्या जीविताशी खेळ केला जात आहे तर प्रशासनाने केलेल्या कारवाईनंतरही पुन्हा मावा स्टॉल धडाक्यात सुरु होतात असे दिसून येत आहे .

नगर शहरातील पाईपलाईन रोड, तपोवन रोड, माळीवाडा या ठिकाणी या माव्याच्या अक्षरशः कंपन्या सुरू झालेल्या असून मावा मळण्यासाठी पूर्वीच्या तुलनेत माणसे मिळत नसल्याने काही महाभागांनी मशिनरी आणून आपला व्यवसाय वाढवलेला आहे. मोठ्या प्रमाणात नफा या व्यवसायात मिळत असल्याने तसेच कुठल्याही पद्धतीचा टॅक्स द्यावा लागत नसल्याने माव्याच्या जीवावर टोलेजंग इमारती अनेक जणांनी उभ्या केलेल्या आहे. आपल्या माव्याचा ब्रँड महाराष्ट्र राज्यात सर्वत्र पोहोचावा यासाठी पाकिटावर स्टिकर लावून जाहिरातबाजी देखील केली जात असून तरुण पिढी गुटख्यापाठोपाठ आता माव्याची शिकार होत आहे.


शेअर करा