
दारूमुळे होणारे दुष्परिणाम काही कमी नाहीत. दारुने अनेक जणांची कुटुंबे देखील उध्वस्त झालेली आहेत तर गुन्हेगारीचे देखील प्रमाण मोठ्या प्रमाणात दारू पिल्यानंतर वाढते मात्र एका व्यक्तीने दारूचा जो काही वापर केला त्याची जिल्ह्यात चर्चा झालेली असून या तरुणाने धान पिकाच्या नर्सरीवर देशी दारू फवारणी केली आणि आपली पिके रोगमुक्त केलेली आहेत .
भंडारा जिल्ह्यातील हे प्रकरण असून रामदास गोंदोळे (तालुका लाखनी ) असे या शेतकऱ्याचे नाव असून त्याने या प्रकाराचा व्हिडिओदेखील सोशल मीडियावर व्हायरल केलेला आहे. फवारणीसाठी दारूचा वापर केला म्हणून आपल्या पिकाला याचा फायदा झाला असे त्याचे म्हणणे असून वातावरणातील धुके पडण्याचे प्रमाण वाढल्याने धान पिकाचे पाने पिवळे होऊन किडग्रस्त होते म्हणून आपण हा प्रकार केला आणि त्याचा आपल्याला सकारात्मक फायदा झाला असे त्यांचे म्हणणे आहे. अद्यापपर्यंत कुठल्याही कृषी विद्यापीठाने अशा मद्यप्रयोगाला मान्यता दिलेली नाही.
रामदास यांनी याप्रकरणी बोलताना उन्हाळी धान पिकाची नर्सरी दरवर्षी गारवा असल्याने कोमेजून जात होती. अनेक महागड्या औषधांच्या फवारण्या करून पाहिल्या मात्र त्याचा अपेक्षित असा परिणाम दिसून आला नाही. देशी दारूची फवारणी केल्याने पीक जोमात आल्याची माहिती त्यांनी युट्युब वर पाहिली होती त्यानंतर त्यांनी हा प्रकार केला आणि अवघ्या चार ते पाच दिवसात आपले पीक हिरवेगार झाले असे देखील त्यांनी म्हटलेले आहे.