
नगर शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीचे प्रमाण वाढलेले पाहायला मिळत असून अनेक खुनाच्या प्रकरणाची देखील उकल अद्यापपर्यंत झालेली नाही. खून, दरोडे, जातीय दंगली यामुळे जिल्ह्यात कायदा व्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनलेला असून पोलिसांचा धाक राहिलेला नाही त्यामुळे अधिकाऱ्यांना संबंधित आदेश द्यावेत या मागणीसाठी आमदार संग्राम जगताप यांनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांना गुरुवारी निवेदन दिलेले आहे.
आमदार संग्राम जगताप यांनी दिलेल्या निवेदनामध्ये, ‘ नगर शहर जिल्ह्याचे मुख्यालय असून शहरात मोठ्या प्रमाणात बाजारपेठ आहेत. राज्यभरातून ग्राहक येथे खरेदीसाठी येत असून शहरात दिवसाढवळ्या चोऱ्या घरफोडी मंगळसूत्र चोरी असे प्रकार होत आहेत. शहरातील ग्राहक आणि व्यापारी वर्गामध्ये यामुळे भीतीचे वातावरण असून राज्यभर शहराची बदनामी होत आहे त्यामुळे जिल्ह्याची कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी संबंधितांना आदेश देण्यात यावेत असे आमदार संग्राम जगताप यांनी निवेदनात म्हटलेले आहे.