संसदेतून आजीवन अपात्र ठरवले तरीही.., राहुल गांधींनी पुन्हा ठणकावले

शेअर करा

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द झाल्यानंतर राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केलेला असून ‘ मला संसदेतून आजीवन अपात्र ठरवले किंवा तुरुंगवास झाला तरी देशातील लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी लढा कायम राहील ‘ असे आव्हान भाजपला दिलेले आहे. शनिवारी पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी घाबरलेल्या सरकारने आपल्याला अपात्र ठरवलेले असून विरोधकांकडे मोठे शस्त्र दिलेले आहे , असे म्हटलेले आहे.

राहुल गांधी म्हणाले की, ‘ अडाणी मुद्द्यावरून पंतप्रधान मोदी संसदेतील आपल्या भाषणाला घाबरले म्हणून त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आलेली आहे. हा संपूर्ण खेळ पंतप्रधान मोदी आणि गौतम अडाणी यांच्यातील संबंधावरून लोकांचे लक्ष विचलित करण्याचा आहे कारण मी विचारत असलेल्या प्रश्नांची केंद्र सरकारला भीती वाटत होती.’

राहुल गांधी पुढे म्हणाले की, ‘ अडाणी शेल कंपनीमध्ये वीस हजार कोटी रुपये कोणी गुंतवले आणि त्या व्यावसायिकाचे पंतप्रधान मोदी यांच्याशी काय संबंध आहेत हे प्रश्न देशापुढील आहेत. देशातील लोकशाही सध्या संपलेली असून ब्रिटनमध्ये आपण बोललेल्या वक्तव्यात कधीही परकीय हस्तक्षेपाची मागणी केली नाही मात्र संसदेत आपल्या विरुद्ध खोटे बोलण्यात आले त्यावर आपल्याला उत्तर द्यायचे आहे मात्र परवानगी देण्यात आली नाही .’

एका पत्रकाराने राहुल गांधी यांना माफीवरून प्रश्न विचारला होता त्यावेळी राहुल गांधी यांनी ,’ माझे नाव सावरकर नाही माझे नाव गांधी आहे. गांधी कुणाला माफी मागत नाहीत असे म्हटलेले असून केंद्र सरकारला सर्वांचे लक्ष विचलित करायचे आहे. तुम्ही चोर पकडला तर पहिली गोष्ट म्हणजे ते म्हणतील मी ते केलेले नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते म्हणतील तिकडे बघा असाच प्रकार सध्या भाजप करत आहे .’

राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा ठोठावल्यानंतर अपील करण्यासाठी 30 दिवसांची मुदत होती मात्र त्याआधीच त्यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आल्यानंतर ज्या पद्धतीने हा निर्णय घेण्यात आला त्यावर देखील सोशल मीडियात टीकेची झोड उठलेली असून केंद्र सरकारला प्रश्न विचारणारे व्यक्ती सहन होत नाहीत हे समोर आलेले आहे. याआधी देखील संसदेत माइक बंद करणे, गदारोळात कुठलीही चर्चा न करता मनमानी पद्धतीने बिल पास करणे असे प्रकार घडलेले असून देशाची लोकशाहीवादी प्रतिमा यामुळे डागाळली जात आहे.


शेअर करा