
नगर महापालिकेतील मनपा सदस्यांची मुदत डिसेंबर अखेर संपणार असून त्यानंतर महापालिकेत निवडणूक अपेक्षित आहे मात्र शासकीय पातळीवर या संदर्भात कुठल्याच हालचाली दिसत नसून विद्यमान नगरसेवक आणि भावी नगरसेवक यांची देखील कोंडी झालेली आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर महापालिका निवडणुका लांबणीवर टाकण्यात आलेल्या आहेत त्यामुळे सत्ताधारी पक्षांनी पराभवाचा धसका घेतलेला आहे का ? याची देखील जोरदार चर्चा सुरू आहे.
2024 मध्ये देशात लोकसभा निवडणूक आहे आणि काही राज्यात विधानसभा निवडणूक देखील आहे त्यामुळे महापालिकेच्या निवडणुका त्यानंतरच होण्याची शक्यता असून ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून देखील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या दीड ते दोन वर्षांपासून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी प्रलंबित पडलेल्या आहेत.
महापालिका निवडणुकीची तयारी काही महिने आधी सुरू सुरु होत असते आणि त्यानंतर प्रभागाची रचना , त्यावरील हरकती , प्रभागातील आरक्षण , मतदार यादी अशा सर्व प्रक्रियेत सुमारे काही महिने निघून जातात. निवडणुकीच्या उत्साहात संपूर्ण शहरातील विद्यमान आणि माजी नगरसेवक आणि भावी नगरसेवक देखील कार्यरत असतात मात्र नगर महापालिकेतील निवडणुकीबद्दल सध्या राजकीय वातावरण पूर्णपणे थंड असल्याने एक जानेवारीपासून महापालिकेत प्रशासकीय सत्ता येण्याची चिन्हे आहेत .