
सोशल मीडियावर सध्या एका प्रकाराची जोरदार चर्चा सुरू असून एका व्यक्तीला सोन्याच्या दातांवरून मुंबईत बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत. पैशाचा अपहार केल्याप्रकरणी त्याला पंधरा वर्षांपूर्वी अटक करण्यात आली होती मात्र त्यानंतर तो जामीनावर सुटला आणि फरार झाला. पोलिसांनी अखेर त्याला अटक केलेली असून आरोपीच्या तोंडामध्ये दोन सोन्याचे दात आहेत अशी माहिती होती आणि या दोन सोन्याच्या दातांवरून तो पोलिसांच्या जाळ्यात आला.
प्रवीण आशुभा जडेजा असे आरोपीचे नाव असून 2007 साली तो एका ठिकाणी सेल्समनचे काम करत होता त्यावेळी त्याने पैशाचा अपहार केलेला होता. सार्वजनिक शौचालयात आपण लघुशंकेसाठी गेलो आणि तिथे आपल्याला अज्ञात व्यक्तीनी मारहाण केली असे सांगत त्याने रक्कम लंपास केली होती. पोलिसांनी केलेल्या तपासात त्याचा हा बनाव उघडकीला आला आणि त्याला बेड्या ठोकण्यात आल्या मात्र तो जामिनावर सुटला आणि त्यानंतर फरार झाला.
पोलीस पथक त्याचा शोध घेत असताना त्याचे डाव्या बाजूचे पुढचे दोन दात सोन्याचे आहेत ही माहिती पोलिसांना मिळाली आणि त्यानंतर त्यांनी परिसरातील खबऱ्यांना याप्रकरणी माहिती दिलेली होती. पोलिसांनी खबऱ्यांच्या माध्यमांतून त्याची व्यवस्थित माहिती आधी जमा केली आणि त्यानंतर त्याची पॉलिसी मॅच्युअर झालेली आहे या बहाण्याने त्याला मुंबई येथे बोलावले आणि त्यानंतर त्याला तात्काळ ताब्यात घेण्यात आले.