स्वेच्छानिवृत्ती घेऊन पोलिसाने धरला तस्करीचा मार्ग , डील पूर्ण होणारच होत पण..

शेअर करा

पैशापुढे सर्व काही गौण ठरते याची दुर्दैवाने प्रचिती देणारी एक घटना समोर आलेली असून पोलीस दलात गुन्हे शाखेत काम करणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याने चक्क स्वेच्छानिवृत्ती घेऊन तस्कर बनणे पसंत केलेले आहे. आरोपीला पकडल्यानंतर तो एकेकाळी पोलिसात काम करत होता हे ऐकल्यानंतर सातारा पोलीस देखील चकित झालेले आहेत. श्रीमंत होण्याच्या हव्यासापोटी या व्यक्तीने चक्क व्हेल माशाच्या उलटीची तस्करी केलेली आहे. त्यांचा हा कट यशस्वी होण्याच्या मार्गावरच होता मात्र अखेर सातारच्या एलसीबी पोलिसांनी हा कट उधळून लावलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, किरण भाटकर ( वय 50 राहणार भाटिये तालुका जिल्हा रत्नागिरी ) हा व्यक्ती यापूर्वी रत्नागिरी पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत होता. काही दिवसांपूर्वी त्याने स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि पैसा मिळवण्यासाठी काय करता येईल याचा शोध घेत असतानाच व्हेल माशाच्या उलटीचा जादुई बिजनेस त्याला सापडला. रत्नागिरीतील सिद्धार्थ लाकडे या व्यक्तीच्या ओळखीने कोल्हापुरातील हातकणंगले येथील एक व्यक्ती अनिस शेख हा व्हेल माशाच्या उलटीच्या तस्करीत काम करत असल्याची माहिती त्याच्या हाती लागली आणि त्यानंतर रत्नागिरीतून एका ठिकाणावरून व्हेल माशाची उलटी मिळवण्यात आली.

सदर उलटीची डील एका मुंबईतील गर्भश्रीमंत असलेल्या व्यक्तीसोबत ठरलेली होती मात्र तिथपर्यंत ही उलटी पोहोचवायची कशी ? हा प्रश्न असल्याने पोलिसाचा अनुभव कामी आला आणि त्यानंतर चक्क रुग्णवाहिकेतून जर ही उलटी मुंबईपर्यंत पोहोचली पोहोचवली तर आपले काम फत्ते झाले असा या टोळक्याचा अंदाज होता.

रत्नागिरीतील रुग्णवाहिका चालक असलेला नासिर राऊत याला कराडवरून पेशंट आणायचा आहे असे सांगून रुग्णवाहिका बुक करण्यात आली. कराडमध्ये आल्यानंतर मात्र चालकाने कुठे जायचे आहे असे विचारल्यानंतर तुम्हाला भाडे दिले तर बस झालं ना असे म्हणत पुण्याच्या दिशेने रुग्णवाहिका घेण्यास सांगितले होते मात्र सातारा एलसीबीने त्यांची रुग्णवाहिका अडवली त्यावेळी निवृत्त पोलीस आणि रुग्णवाहिका चालक यांची भंबेरी उडाली आणि अखेर ही उलटी जप्त करण्यात आली. रुग्णवाहिका चालकाने मात्र पेशंट आणायचा आहे असे सांगून रुग्णवाहिका बुक केलेली होती असे सांगून आपले हात वर केले. रुग्णवाहिका सहसा अडवली जात नाही म्हणून आरोपींनी या प्रकरणात रुग्णवाहिकेचा वापर केलेला होता मात्र हा प्रयत्न पोलिसांच्या सतर्कतेमुळे अयशस्वी झालेला आहे.


शेअर करा