
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईचा भल्या भल्या सरकारी अधिकाऱ्यांना चांगलाच धसका असतो. असाच एक प्रकार जालना इथे समोर आलेला असून आपल्या पाठीमागे सापळा रचलेला आहे याचा संशय येताच एका पोलीस उपनिरीक्षकाने चक्क घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रकार समोर आलेला आहे. विशेष बाब म्हणजे लाचेची रक्कम या अधिकाऱ्याने रस्त्यातच फेकून दिली मात्र तरीदेखील एसीबीच्या पथकाने पाठलाग करून त्यास ताब्यात घेतलेले असून त्याच्या कारमधील 9 लाख 41 हजार रुपयांची रोकड आणि तब्बल 25 तोळे सोने पथकाच्या हाती लागलेले आहे. जालना शहरात बुधवारी ही कारवाई करण्यात आलेली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, गणेश शेषराव शिंदे ( पोलीस उपनिरीक्षक वर्ग दोन अधिकारी ) असे लाच घेणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव असून जालना शहरातील कदीम पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात तक्रारदार व्यक्ती यांना जामीन मिळालेला आहे. सदर प्रकरणात कलम 110 ऐवजी 107 प्रमाणे प्रतिबंधक कारवाई करण्यासाठी आणि गुन्ह्यामध्ये मदत करण्यासाठी फौजदार गणेश शिंदे यांनी एक लाख रुपयांची लाचेची मागणी केलेली होती.
तक्रारदार व्यक्ती यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ नंबरवर फोन करून या संदर्भात तक्रार दिल्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथील एसीबी पथक सक्रिय झाले त्यानंतर कदीम पोलीस ठाण्याच्या आवारात सापळा रचण्यात आला त्यावेळी शिंदे यांनी लाचेची मागणी करत 75 हजार रुपये घेतले मात्र पैसे हातात पडल्यानंतर पथक मागे असल्याचा सुगावा लागला आणि फौजदार यांनी चक्क कारमध्ये पळून जाण्यास सुरुवात केली.
एसीबीच्या पथकाने जिद्द सोडली नाही आणि तब्बल तीन किलोमीटर पाठलाग करत शिंदे याला ताब्यात घेतले. कारची तपासणी केली असता त्याने घेतलेली रक्कम ही रस्त्यातच फेकून दिलेली होती तर कारमध्ये तब्बल नऊ लाख 41 हजार रुपयांची कॅश आणि 25 तोळे सोने देखील आढळून आलेले आहे. सदर मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. पोलीस निरीक्षक नंदकुमार क्षीरसागर, पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अप्पर पोलीस अधीक्षक विशाल खांबे उपाधीक्षक मारुती पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आलेली आहे .