संत भगवानबाबा यांच्या प्रेरणेतूनच साकारतेय ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी ‘ गुड न्यूज ‘

शेअर करा

मुंबई ( पत्रकार गोरख मोरे यांचेकडून ) : श्रावण वद्य पंचमी ही ऐश्वर्यसंपन्न संत भगवानबाबांची जयंती निमित्ताने राज्यातील ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठी यावर्षीपासून संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजनेच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात होत आहे. भगवानबाबांनी कीर्तन-प्रबोधनाचा प्रभावी मार्ग वापरून ग्रामीण मराठवाड्यात शिक्षण, व्यसनमुक्ती सारख्या बाबींचा प्रसार केला. ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठी वसतिगृह योजना सुरू करणे, हे भगवानबाबांच्या जीवनकार्यातूनच घेतलेली प्रेरणा आहे; असे मत राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री ना. धनंजय मुंडे यांनी संत भगवानबाबा जयंतीच्या पूर्वसंध्येला व्यक्त केले आहे.

अनिष्ट-रूढी परंपरांना मूठमाती द्यायला शिकवणारे आधुनिक युगातील थोर संत भगवानबाबा यांच्या जयंतीनिमित्त ना. धनंजय मुंडे यांनी भगवानबाबांच्या कार्याचे स्मरण करत त्यांना अभिवादन केले असून, संत भगवानबाबा जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान कोरोना विषयक परिस्थिती व संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेत संत भगवानबाबा यांची जयंती साध्या पद्धतीने साजरी केली जावी, असे आवाहनही ना. मुंडे यांनी संत भगवानबाबा भक्तांना केले आहे.

वारकरी संप्रदायाची पताका खांद्यावर घेऊन सकल समाजाच्या हितासाठी आपले आयुष्य वेचलेले, अज्ञान व अंधश्रद्धा जोपासणाऱ्या बहुजन समाजाला शिक्षणाची कास धरण्याचा मोलाचा संदेश देणारे संत भगवानबाबा हे आदर्श असून आपण त्यांच्या विचारांचे अनुयायी व निस्सीम भक्त आहोत, असेही धनंजय मुंडे यांनी त्यांच्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.


शेअर करा