अमरसिंह पंडित यांच्या ‘ या ‘ मागणीला दिव्यांग संघटनेचा पाठींबा , दिव्यांगांसाठी गुड न्यूज

शेअर करा

आष्टी प्रतिनिधी गोरख मोरे यांचेकडून : दिव्यांग व्यक्तिंची तपासणी करून त्यांना दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र देण्याचे काम सध्या जिल्हा शासकीय रुग्णालयातून सुरु आहे.मात्र जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून दिव्यांग विशेषतः अंध,मंतीमंद व बहूविकलांग व्यक्तिंना जिल्ह्याच्या ठिकाणी दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र घेण्यासाठी ये – जा करणे खूपच त्रासदायक ठरत आहे,त्यामुळे दिव्यांग प्रमाणपत्र देणारे बोर्ड तालुकास्तरावर कार्यान्वित करून उपजिल्हा रुग्णालये आणि ग्रामीण रुग्णालयातून दिव्यांग व्यक्तिंना आवश्यक प्रमाणपत्र मिळण्याची सुविधा मिळावी अशी मागणी माजी आ.अमरसिंह पंडित यांनी सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे केली होती त्यावर सत्वर कार्यवाहीचे निर्देश दोन्ही मंत्र्यांनी दिले आहेत.त्यामुळे लवकरच दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र देणारे बोर्ड तालुकास्तरावर कार्यान्वित होणार आहे. शासनमान्य महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटना शाखा बीडने या मागणीस पाठींबा दिलेला आहे,अशी माहिती बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र लाड यांनी दिली आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दि.२२ जुलै रोजी जिल्हा आरोग्य यंत्रणेने संकल्प निरोगी बीड हे अभियान यशस्वीपणे राबविले.या अभियानामध्ये एक दिवसासाठी दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र देणारे बोर्ड तालुकास्तरावर कार्यान्वित करण्यात आले होते.या संकल्पनेचा धागा पकडून माजी आ.अमरसिंह पंडित यांनी दिव्यांगांना आवश्यक प्रमाणपत्र मिळताना होत असलेल्या अडचणी दूर करण्याच्या उद्देशाने दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र देणारे बोर्ड तालुकास्तरावर कार्यान्वित करण्याची मागणी केली आहे. दिव्यांग विशेषतः अंध,मतीमंद,बहूविकलांग व्यक्तिंना जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून जिल्हास्तरावर येवून जिल्हा रुग्णालयात नोंदणी करणे,तपासण्या करणे आणि तासंतास रांगेत उभा राहणे अशा कठिण परिस्थितीला सामोरे जावे लागते.यासाठी त्यांची मोठ्या प्रमाणावर हेळसांड होत असल्याच्या तक्रारी दिव्यांग कर्मचारी संघटनेकडे येत होत्या.

तालुकास्तरावर उपजिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालयात दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र देणारे बोर्ड कार्यान्वित करून तालुक्यातील दिव्यांग व्यक्तिंना तालुकास्तरावर आवश्यक प्रमाणपत्र उपलब्ध झाल्यास दिव्यांगांना सहज आणि सुलभ पध्दतीने प्रमाणपत्र मिळू शकेल.त्यामुळे ही सुविधा तातडीने सुरु करण्याची मागणी माजी आ.अमरसिंह पंडित यांनी केली आहे.यासाठी राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेवून त्यांना लेखी निवेदन दिले.ना.टोपे यांनी आरोग्य संचालकांना या बाबत निर्देश देवून कार्यवाहीचे दिले आहेत.तर सामाजिक न्याय विभागाकडून लवकरच दिव्यांगांचे नवीन धोरण जाहिर होणार असून यामध्ये दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र देणाऱ्या बोर्डाचा समावेश करण्याच्या सूचना संबंधितांना देणार असल्याचे आश्‍वासन ना.धनंजय मुंडे यांनी दिले आहे.

दोन्ही मंत्र्यांच्या आश्‍वासनामुळे लवकरच दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र देणारे बोर्ड तालुकास्तरावर कार्यान्वित होणार आहे.या मागणीचा निश्चितच विचार होवून तालुकास्तरावर दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र देणारे बोर्ड कार्यान्वित होवून दिव्यांग बंधू – भगिनींनी भविष्यात जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्याची गरज लागणार नाही.यासाठी शासन पातळीवर शासनमान्य महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटना पाठपुरावा करणार असून मा.आ.अमरसिंह पंडित यांच्या दिव्यांग हितार्थ मागणीचे स्वागत संघटनेच्या वतीने प्रदेश उपाध्यक्ष महादेव सरवदे,बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र लाड, इंद्रजित डांगे,मधूकर अंबाड,सौदागर कुर्हे,नंदकुमार मोरे,पुंडलीक पाटील,आर.पी.शिंदे,बाळासाहेब सोनसळे,दत्तात्रय गाडेकर,बाळासाहेब कांबळे,शेषराव सानप,श्रीम.संजिवनी गायकवाड,श्रीम.वैशाली कुलकर्णी,श्रीम.आशा बारगजे आदींनी केले आहे.


शेअर करा