लुडोचे अनेक फॅन्स असले तरी एकदा हा नाद लागला की मग सहजासहजी हा नाद सुटत नाही. लुडोच्या आधीन असलेल्या एका महिलेचं तिच्या दीरावर प्रेम जडलं आणि दोघांनी पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय देखील घेतला. घरच्यांना काहीच कल्पना न देता दोघेही दीर भावजय पळून गेले आणि लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले. लवकरच लग्न करण्याचा निर्णयदेखील त्यांनी घेतला अन त्यासाठीची सगळी तयारी पूर्ण झाली मात्र त्याआधीच एक धक्कादायक घटना घडली आणि दिराच्या नादी लागून घर सोडलेल्या महिलेवर चक्क कपाळाला हात लावण्याची पाळी आली.
उपलब्ध माहितीनुसार, राजस्थानच्या जोधपूरमध्ये राहणारी नितू नावाची महिला ऑनलाईन लुडो खेळाची चाहती होती. तिचा दीर प्रवीणदेखील हाच खेळत असे. दोघांचीही या खेळाच्या निमित्ताने चांगलीच गट्टी जमली. त्यानंतर एकमेकांना मेसेज पाठवणे सुरु झाले आणि त्यांनी नात्याच्या मर्यादा पार केल्या मात्र आता लग्न केल्याशिवाय पर्याय नाही, हे लक्षात आल्यानंतर दोघांनी घरातून पळून जाण्याचा निर्णय घेतला आणि घर सोडून ते जोधपूरमध्ये एका ठिकाणी रहायला आले.
जोधपूरमध्ये दोघांनी एक घर भाड्याने घेतलं आणि तिथे ते लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले. लवकरच लग्न करण्यासाठी कोर्टात नोंदणी करून तारीखदेखील निश्चित केली. लग्नाची तारीख जवळ आली असतानाच नीतूला खरा धक्का तेव्हा बसला जेव्हा तिचा प्रियकर असलेला दीर प्रवीण त्या दिवशी घरीच आला नाही. दुसऱ्या दिवशीदेखील तो घरी न आल्यामुळे तो गायब झाल्याचं नीतूच्या लक्षात आलं. तिनं पोलिसांत याबाबत तक्रार नोंदवली असून प्रवीणच्या घरच्यांनीच त्याला गायब केले आहे, असे तिचे म्हणणे आहे.
हे लग्न होऊ नये, यासाठी प्रवीणच्या घरच्यांनी त्याला गायब केल्याचा आरोप केल्यानंतर पोलिसांनी प्रवीणचा शोध सुरु केला आहे. अद्याप प्रवीणचा कुठलाही शोध लागला नसून तो नेमका कुठे आहे, याची माहिती मिळालेली नाही. दरम्यान, नीतू आणि तिच्या पतीचं आता अजिबात पटत नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. नीतू आणि तिच्या पतीमध्ये 8 वर्षांचं अंतर असून पतीसोबत राहण्याची इच्छा नसल्याचं नीतून सांगितलं असल्याने पोलिसांना प्रवीणचा शोध लवकरात लवकर घेणे गरजेचे झाले आहे .