‘ ते मूल माझे नाही ‘ , पोलीस उपनिरीक्षक पतीने पत्नीसोबत केला धक्कादायक प्रकार

शेअर करा

‘ गर्भात वाढणारे मुल हे माझे नसून ते काढून टाक ‘ असे म्हणत पत्नीचा गळा दाबून तिच्या पोटावर पोलीस उपनिरीक्षक पतीने लाथ मारली तर दिराने वाईट हेतूने विनयभंग केला अशा तक्रारीनंतर पीडित पत्नीने दिलेल्या फिर्यादीनुसार सात जणांवर सोलापूर येथील विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

उपलब्ध वृत्तानुसार, पीडित महिलेचे 2020 मध्ये मुंबई येथील पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या आरोपी सोबत कुर्डूवाडी जिल्हा सोलापूर येथे विवाह झाला होता. लग्नानंतर आरोपी हा आपल्या कुटुंबियांसोबत पीडित पत्नीला मुंबई येथे घेऊन गेला. तिथे काही दिवस पत्नीला चांगले नांदवले मात्र त्यानंतर पीडितेला सासू-सासरे दीर यांनी छोट्या छोट्या कारणावरून तिला त्रास द्यायला सुरू केले. त्रास देत असताना तिला उपाशी ठेवणे, मारहाण करणे, दिराने वाईट हेतूने तिचा विनयभंग करणे असे प्रकार सुरु होते.

भांडणे विकोपाला गेल्यावर पतीने पत्नीला सोलापूर येथे आणून सोडले आणि त्याच्या आई-वडिलांना शिवीगाळ करत सगळे जण निघून गेले. याच दरम्यान लग्नाच्यावेळी मध्यस्थी करणाऱ्या चुलत सासऱ्याने देखील विविध जाचक अटी आणि शर्ती भांडणात घातल्या. पीडित महिला गर्भवती राहिली असताना ‘ हे मूल माझे नाही तुझे दुसऱ्या कोणासोबत तरी संबंध आहेत ‘, असे म्हणत तिच्या चारित्र्यावर संशय घेत तिचा गळा दाबून मारण्याचा प्रयत्न केला. याच दरम्यान झालेल्या भांडणात पत्नीच्या पोटावर जोरात लाथ मारल्यामुळे रक्तस्राव होऊन तिचा गर्भपात झाला आणि त्यानंतर त्याने तिला सोलापूर येथे आणून सोडले, ‘ अशा आशयाची फिर्याद पीडित महिलेने सोलापूर येथे दिली असून प्रकरणाचा तपास सुरु आहे.


शेअर करा