शेतकरी आंदोलन पुन्हा पेटणार ? , २० लाख शेतकऱ्यांच्या उपस्थितीत घेतला मोठा निर्णय

शेअर करा

कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या शेतकरी आंदोलनाने पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी होताच जोर धरला आहे. शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी उत्तर प्रदेशमध्ये महापंचायतीच्या माध्यमातून कृषी कायदे तसेच शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांना घेऊन पुन्हा एकदा केंद्र सरकारवर टीका केली असून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी त्यांनी 27 सप्टेंबर रोजी भारत बंदची घोषणा केली आहे. शेतकरी आंदोलन भाजपच्या अडचणी वाढवत असल्याचे चित्र निर्माण होताना दिसत आहे.

काय म्हणाले राकेश टिकैत ?

मागील नऊ महिन्यांपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर बसलेले आहेत. या वर्षाच्या जानेवारीपासून सरकारने आमच्याशी संवाद साधणं बंद केलेलं आहे. देशाची संपत्ती विकणाऱ्यांना आपण ओळखलं पाहिजे. फक्त उत्तर प्रदेशच नव्हे तर उत्तराखंड तसेच संपूर्ण देशात अशा सभा आणि बैठका घेतल्या पाहिजेत. देशात रेल्वे, जहाज आणि विमानतळं विकले जाणार आहेत, त्यांना सत्तेतून हद्दपार करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य भाव मिळाला नाही तर निवडणुकीत मतदानही मिळणार नाही . ही लढाई कृषी कायदे आणि किमान आधारभूत किंमत यासाठी आहे. शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य भाव मिळत नसेल तर शेतकरी मतदान करणार नाहीत. आता मतदानाच्या माध्यमातून आपल्याला घाव घालावा लागेल

मागील कित्येक महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. केंद्राने लागून केलेल्या कृषी कायद्यांना परत घ्यावं अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे. या मुद्द्यावर शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यात चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या. मात्र या चर्चांतून केंद्राच्या अडेलतट्टू भूमिकेमुळे कोणताही ठोस मार्ग निघालेला नाही. शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व करणारे राकेश टिकैत उत्तर प्रदेशमध्ये महापंचायतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे मेळावे भरवत असून पुन्हा शेतकरी आंदोलन जोर पकडणार असल्याचे चित्र आहे.

उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असतानाच या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशमध्ये आज 5 सप्टेंबरला शेतकऱ्यांची महापंचायत भरवण्यात आली होती त्यावेळी टिकैत यांनी 27 सप्टेंबर रोजी भारत बंदची घोषणा केली आहे. शेतकरी मोर्चाने आयोजित केलेल्या आजच्या महापंच्यातीला हजारो शेतकऱ्यांनी उपस्थिती लावली. तब्बल २० लाखांच्या वर शेतकरी यावेळी हजर असल्याचा दावा राकेश टिकैत यांनी केला आहे . 27 सप्टेंबर रोजी भारत बंदची घोषणा केल्यामुळे आगामी काळात शेतकऱ्यांचे आंदोलन या निवडणुकांमध्ये मोठी भूमिका बजावणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


शेअर करा