धक्कादायक..आयसिसशी संबंध असल्याच्या संशयावरून पुण्यात महिलेसह आणखी एकाला अटक : कशी झाली कारवाई ?

  • by
चित्र : प्रतीकात्मक

पूर्ण देश कोरोनाने त्रस्त असताना पोलीस आणि सरकार कोरोना लढ्यात अडकून पडलेले असल्याने गुन्हेगारांच्या सोबत आता दहशतवादी संघटना देखील देशात हातपाय पसरवण्याच्या मागे असल्याचे दिसते आहे. आज पुणे इथे आयसिस या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या पथकाने (एनआयए) ने एका महिलेसह एका पुरुषासही अटक केली आहे. .सादिया अन्वर शेख (वय २१, रा. येरवडा) आणि नबील सिद्दिकी खत्री (वय २७, रा. कोंढवा) अशी त्यांची नावे आहेत . सादिया हिला याआधी देखील दोन वेळा ताब्यात घेण्यात आले होते .

एनआयए आणि दिल्ली पोलिसांच्या ताब्यात असलेल्या एका सूत्राकडून एनआयएला यांच्याबद्दल माहिती मिळाली होती. त्यानंतर एनआयएने या दोघांवर नजर ठेवली होती. ते पुण्यात स्लिपर सेल म्हणून काम करत असल्याचे त्यांच्या तपासात दिसून आल्यावर दिल्लीतून एनआयएचे पथक थेट पुण्यात येऊन धडकले. त्यांनी राज्य दहशतवाद विरोधी पथक व स्थानिक पोलिसांच्या मदतीने विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई केली आहे .

सादिया शेख ही अल्पवयीन असल्यापासून इसिसच्या संपर्कात असल्याचा यंत्रणांना संशय आहे तर तिच्यासोबत पकडलेला नबील खत्री हा कोंढव्यात जीम ट्रेनर म्हणून काम करतो. एनआयएने अटक केलेल्या सादिया शेख हिचा आजवरचा इतिहास नेहमीच संशयास्पद राहिला आहे. २०१५ मध्ये मध्ये देखील तिच्यावर नजर ठेवण्यात आली होती त्यात ती इसिसच्या संपर्कात असल्याचे इंटरनेटवरील पडताळणीवरुन लक्षात आले होते.

त्यानंतर तिचे अनेक दिवस समुपदेशन करण्यात आले होते. त्यासाठी मुस्लिम समुदायातील मौलवींनी मोठी मदत केली होती.त्यानंतर तिच्या आईसमोर तिने आपण आता त्यांच्याशी संपर्कात राहणार नसल्याचे सांगितले होते मात्र पुन्हा एकदा तिला पकडण्यात आल्याने यावेळी तरी कठोर कारवाई करून देशातील आयसिसचे नेटवर्क उखडून टाकण्याची वेळ आली आहे .