चंद्रपूर हादरले.. भर रस्त्यात तरुणीला अडवले आणि त्यानंतर ..

चंद्रपूरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून येथील एका तरुणानं एकतर्फी प्रेमातून एका तरुणीवर चाकूनं सपासप वार केले आहेत. आरोपीनं भररस्त्यात तिला अडवून हे कृत्य केल्यामुळे चंद्रपुरात कायदा सुव्यवस्था कितपत आहे हा देखील प्रश्न उपस्थित झाला आहे .आसपासच्या लोकांनी रक्तबंबाळ झालेल्या तरुणीला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं मात्र तिची परिस्थिती गंभीर असल्याचे समजते. पोलिसांनी मात्र त्यानंतर अवघ्या तीन तासात आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

उपलब्ध वृत्तानुसार, संबंधित घटना चंद्रपूर शहरातील महाकाली मंदिर मार्गावर गुरुवारी सायंकाळी सातच्या सुमारास घडली आहे. हल्ला केल्यानंतर या मार्गावरील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आरोपी पळून जाताना आढळला. अचानक झालेल्या थरारक घटनेनं परिसरात काही काळ तणावाचं वातावरण तयार झालं मात्र पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा तर केलाच आणि अवघ्या तीन तासांत आरोपीला बेड्याही ठोकल्या .

आरोपी हा संबंधित तरुणीचा ओळखीचा असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. संबंधित आरोपी मागील काही दिवसांपासून पीडित तरुणीवर एकतर्फी प्रेम करत होता. पण पीडित तरुणीनं त्याला नकार दिल्यानं त्यानं तरुणीवर धारदार शस्त्रानं हल्ला केल्याचा प्राथमिक संशय पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे. संबंधित तरुणीची प्रकृती गंभीर असून जिल्हा रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत.