चिंचाळा येथील खटकळी साठवण तलाव फुटण्याच्या मार्गावर ?

आष्टी प्रतिनिधी गोरख मोरे यांचेकडून : आष्टी तालुक्यात काही महसुल मंडळात दमदार पाऊस झाल्याने धरणात पाण्याची आवक वाढली आहे. बहुतांशी प्रकल्प हे १०० टक्के भरले आहेत. चिंचाळा येथील खटकळी बाबा देवस्थानजवळील खटकळी मध्यम साठवण तलाव १०० टक्के भरला असून त्यांची संरक्षण भराव भिंत फुटण्याच्या मार्गावर असून भिंतीला मोठं मोठे भगदाड पडले आहेत.याबाबत चिंचाळा ग्रामस्थांनी वारंवार तक्रार देऊन देखील लघु पाटबंधारे विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करत असल्याची तक्रार गावकरी करत आहेत.

खटकळी मध्यम साठवण तलाव ३० वर्षापूर्वी हा तलाव तयार झाला असून मागील चार ते पाच दिवसाच्या जोरदार पावसाने १०० टक्के भरला आहे. सांडव्यामधून पाणी पडले आहे.मात्र,तलावाच्या मुख्य संरक्षण भिंतीला मोठे भगदाड पडले आहे. पावसाळ्याचे उर्वरित दिवस लक्षात घेता, हवामान खात्याने देखील पुढील काही दिवस जोराचा पाऊस सांगितला आहे. अचानक जोराचा पाऊस होऊन डोंगरातून पाण्याचा मोठा लोंडा आला तर दगडी भरावाला भगदाड पडल्याने माती खचून तलाव फुटण्याची शक्यता आहे ? यामुळं चिंचाळा,शिदेवाडी,कासारी या गावांना धोका होऊ शकतो. या गावातील नागरिकांत देखील भीतीचे वातावरण झाले आहे. तसेच या भागातील शेती मालाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते? चिंचाळा ग्रामस्थांनी याबाबत लघु पाटबंधारे विभागाला कळवले आहे मात्र आजपर्यत एक पण अधिकारी व कर्मचारी इकडे फिरकला नसल्याचे ग्रामस्थांनी आमचे प्रतिनिधीकडे बोलताना सांगितले.

तलावाच्या टागडुगीसाठी दरवर्षी शासन निधी देते मात्र तो निधी जातो कुठे? असा सवाल ग्रामस्थांकडून विचारला जात आहे. अधिकारी व ठेकेदार या निधीचा मलीदा करतात का ? असा ही प्रश्न निर्माण होत आहे. याबाबत लघु पाटबंधारे कार्यालयाला विचारणा केली असता हा तलाव कोणत्या अधिकाऱ्याकडे आहे हे समजले नाही. याच विभागातील अधिकारी म्हणाले हे काम आमच्याकडे नाही, काम जुने असून यातील काही अधिकारी देवाघरी गेलेत तर काही सेवानिवृत्त झाले आहेत मग या बाबत नेमका प्रश्न विचारायचा तरी कोणाला असा सवाल उपस्थित झाला आहे.