गुड न्यूज ..नगर जिल्ह्याची जीवनदायिनी भंडारदरा धरण झाले ओव्हरफ्लो

राजूर प्रतिनिधी ललित मुतडक :- संपूर्ण नगर जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या उत्तर नगर जिल्ह्याची जीवनदायिनी समजले जाणारे भंडारदरा धरणं सालाबादप्रमाणे 15 ऑगस्ट च्या आत भरण्याऐवजी यावर्षी आपले रेकॉर्ड मोडीत तब्बल जवळपास 27 दिवसांनी 11039 दलघफु म्हणजे पूर्ण क्षमतेने आज 12 सप्टेंबर रोजी 11 वाजण्याच्या सुमारास ओव्हर फ्लो झाले आहे.

गेल्या महिन्याभरापासून पावसाने दांडी मारली होती.मात्र बुधवारपासून भंडारदरा, घाटघर,मुतखेल,रतनवाडी,पांजरे,वाकी येथे सतत जोर धरून चालणाऱ्या पावसामुळे भंडारदरा धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. त्यामुळे अकोले तालुक्यासह उत्तर नगर जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.या धरणावर आधारित निळवंडे धरणही 85% भरले आहे,त्यामध्ये भंडारदरा धरणातून पाण्याची आवक सुरू असून लवकरच निळवंडे धरणही ओसंडून ओव्हर फ्लो होण्याची शक्यता आहे.पावसाचा जोर वाढल्यामुळे मोठी पाण्याची आवक सुरू आहे.त्यामुळे निळवंडे धरणात पाण्याचीआवक वाढली आहे.धरण भरल्यामुळे पाण्याची पातळी नियंत्रित करण्यासाठी स्पिलवे मधून पाणी सोडण्यात आले.मुळा पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार चालू असल्याने मुळा नदी दुथडी भरून वाहत आहे.

आठवडाभरापासून सुरू असलेल्या पावसाने आदिवासी भागातील शेतीकामाना पुन्हा वेग आला आहे. रखडलेली आवणीच्या कामांत शेतकरी गुंतून गेला आहे.तसेच या सततच्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याचे चित्र सध्या दिसत आहे.मात्र कोरोनामुळे पर्यटकांवर मोठा परिणाम झाल्याचे बोलले जात आहे. तालुक्यात सर्वच भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.आढळा धरण 55 % भरले आहे.

भंडारदरा धरणाच्या सांडव्यातून 2436 क्यूसेस व विद्युत गृहाद्वारे 820 क्यूसेस असा एकूण 3256विसर्ग प्रवरा नदीमध्ये सोडण्यात येत आहे. धरणातील पाण्याची आवक वाढल्यास विसर्गामध्ये आवश्यकतेनुसार वाढ होऊ शकते. त्यामुळे प्रवरा नदीकाठच्या राहिवाश्यानी आपली तसेच आपल्या पशुधनाची व शेती अवजारांची काळजी घ्यावी, असे आव्हान पाटबंधारे विभागाचे वतीने करण्यात आले आहे.