भूतांच्या भीतीवर मोठे होता येईना म्हणून मनोहर भोसलेने खेळली होती ‘ ही ‘ खेळी..

बॉबी देओलची ‘आश्रम’ ही वेबसिरीज सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर प्रचंड लोकप्रिय झाली. आश्रमातला भोंदू महाराज अत्यंत हुशारीने श्रद्धेचा बाजार मांडून लोकांना कशाप्रकारे फसवतो हे दाखवण्याचा प्रयत्न ह्या वेब सीरिजमध्ये केला गेला मात्र धर्माच्या नावाने पोटे भरणाऱ्यांना हा प्रकार काहीसा आवडला नाही आणि त्या वेब सिरीजच्या विरोधात देखील प्रचार केला गेला. अगदी तशीच घटना महाराष्ट्रात उघडकीस आली असून स्वतःला बाळूमामाचा अवतार म्हणवणाऱ्या मन्याचा मनोहर मामा कसा झाला ? ही देखील स्टोरी काही वेगळी नसून एकेकाळी चक्क बाजारात ओरडून बोंबील विकणारा माणूस कसा श्रद्धेचा बाजार मांडून सर्व व्यवस्था वेठीस धरतो आणि लोकांच्या भावनेशी खेळतो याचे उत्तम उदाहरण म्हणता येईल

करमाळा तालुक्यातील उंदरगाव इथे मनोहर भोसले यानं उभारलेल्या आश्रमात दर अमावस्येला जणू बाजार फुलेला असायचा. 3000 देणाऱ्यांना रांगेत उभं राहण्यास सांगितलं जायचं तर एकवीस हजार रुपये देणाऱ्यांना थेट मनोहर भोसलेसमोर उभं केलं जायचं. याठिकाणी येणाऱ्या भोळ्या भाबड्या भक्तांच्या मनात मनोहर उर्फ मनोहरमामा भोसले जणू सद्गुरु बाळूमामाचा अवतार अशी धारणा होती. अक्षरश: बाबाच्या दारात मोठे मोठे लोक येऊन माथा टेकवत असल्याने ह्या बाबाचे प्रस्थ चांगलेच वाढले . सुरुवातीला स्थानिक पातळीवर काही विरोध झाला मात्र राजकीय अनास्था आणि पैशाची ताकत यावर हा विरोध कमी कमी होत गेला.

इंदापूरातल्या लारसुणे गावचा मूळ रहिवासी असलेला मनोहर हा डीएडच्या परीक्षेत नापास झाल्यानंतर आठवडा बाजारात सुके बोंबील विकून आपली गुजराण करत होता. त्यानंतर एके दिवशी हा अचानक गायब झाला आणि काही वर्षानंतर पुन्हा याच गावात आपण बंगाली विद्या शिकून आल्याचा दावा त्याने केला आणि आजूबाजूच्या गावची लोक भूत उतरवायला त्याच्याकडे येऊ लागली. निव्वळ भुतावर आपण जास्त मोठे होऊ शकत नाही म्हणून आता काहीतरी मोठे करावे लागेल हे लक्षात येताच त्याने चक्क आपल्या अंगात बाळूमामा आल्याची पेव सोडून दिली आणि बाबाच्या हस्तकांनी याचे भरपूर मार्केटिंग करत सुरुवातीला गोरगरीब लोक आणि त्यानंतर धनाढ्य लोकांना देखील बाबाच्या भक्तीत ओढून घेतले.

काही कालावधीतच मन्या म्हणून ओळखला जाणारा आता ‘सद्गुरू मनोहरमामा’ बनला . गावात झोपडीत राहणारा मनोहर शिवारात गेला आणि दीड एकरात त्यानं भक्तांनी दिलेल्या पैशावर त्याने आश्रमही बांधला आणि बाबाच्या दिमतीला अलिशान गाड्याही आल्या. मनोहर भोसलेच्या आश्रमात उंदरगाव आणि परिसरातील चार-पाच गावचे लोक जायचे बंद झाले कारण आता बाबा केवळ भूत उतरवणारा बाबा राहिला नव्हता तर तो सद्गुरू झाला होता . आश्रमातील अनेक रंजक कथा आसपासच्या गावात पसरू लागल्याने स्थानिक पातळीवर बाबाचा प्रभाव कमी झाला मात्र बाहेरून मार्केटिंग करून ओढलेले भक्त गर्दी करू लागले. भक्तजनांच्या टोळ्या रोज धडकत असल्याने बाबाला स्थानिक नागरिकाचे फारसे घेणे देणे राहिले नाही .

स्वतःला ज्योतिषाचार्य म्हणून घेणारा मनोहर भोसले भक्तांचं रोगनिवारण करत असल्याचा दावा करत होता. कर्करोग झालेल्या रुग्णास बरा करतो म्हणून त्याची फसवणूक केल्याप्रकरणी मनोहरमामा भोसले याला बारामती पोलिसांनी साताऱ्यातल्या सालपे डोंगरातून ताब्यात घेतलं आहे मात्र दुसरीकडे याच मनोहर बाबाच्या आईला जेव्हा अर्धांगवायू झाला त्यावेळेस त्याने आईला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं होतं. तेव्हा या मनोहर मामाची शक्ती आणि बुवाबाजी कुठे गेली होती? असा सवाल आता विचारला जात आहे. सोलापुरात आश्रमात येणाऱ्या एका महिला शिष्यावर बलात्कार केल्याचा गुन्हा देखील मनोहर भोसलेवर दाखल करण्यात आल्याने तो सध्या पोलीस कोठडीची हवा खात आहे.