.. अखेर पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची बदली, ‘ ह्या ‘ ठिकाणी नवीन पोस्टिंग

नगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणाऱ्या पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची अखेर बदली करण्यात आली आहे .लोकसेवकपदाचा गैरवापर केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. त्यांच्यावरील चौकशीसाठी त्यानंतर समिती देखील नेमण्यात आली होती त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे . कर्तव्यात कसूर केल्याच्या कारणाने त्यांची बदली करण्यात आली असून जळगाव जिल्ह्यात अकार्यकारी पदावर त्यांना नियुक्त करण्यात आले आहे. नियुक्तीच्या ठिकाणीही त्यांना तातडीने हजर राहण्याचे आदेश देण्यात आले असून शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय त्यांना कुठल्याही प्रकारची रजा मंजूर न करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.ज्योती देवरे यांनी मात्र पुन्हा एकदा आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत

शासनाच्या आदेशात म्हटलंय की, पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी राज्य महिला आयोग, नाशिकचे विभागीय आयुक्त यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार या प्रकरणाच्या चौकशीचे निर्देश विभागीय आयुक्तांनी अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तीन महिला अधिकाऱ्यांची चौकशी समिती नेमली आणि या समितीने ज्योती देवरे यांच्या भ्रष्टाचार प्रकरणाची चौकशी करुन त्याचा अहवाल सादर केला.ज्योती देवरे यांनी कामात गंभीर स्वरुपाची अनियमितता केली तसेच अधिकारक्षेत्राबाहेर जाऊन पदाचा दुरुपयोग केल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली. त्यानंतर त्यांची बदली करण्यात आली. ज्योती देवरे यांनी माध्यमांमध्ये भाष्य करुन शासनाची प्रतिमा मलिन केल्याचा आरोपही त्यांच्यावर करण्यात आला आहे.

पदाचा गैरवापर करून वाळूमाफियांना परस्पर कारवाईमुक्त करणे, बेकायदेशीर वाळू उपसा करणाऱ्यांचे ट्रॅक्टर, डंपर, जेसीबी आणि पोकलेन मशिन जप्त केल्यानंतर तडजोड शुल्क सरकारला जमा न करता परस्पर मुक्त करणे असे विविध आरोप तहसीलदार ज्योती देवरे यांच्यावर आहेत. अशा विविध प्रकारे देवरे यांनी ५ कोटी ९४ लाख ९६ हजार ७२ रुपयांचा भ्रष्टाचार केल्याची तक्रार राज्याच्या लोकायुक्तांकडे ३० ऑगस्ट रोजी दाखल करण्यात आली होती.