ग्राऊंड रिपोर्ट : नगरची खड्डा गॅलरी डोळे भरून पहा पण ‘ शेवटचा ‘ चकाचक फोटो नक्की पहा

पटवर्धन चौक

एकीकडे नगर शहरात पावसामुळे रस्ते वाहून गेले आहेत. रस्त्यात खड्डे कि खड्ड्यात रस्ते अशी परिस्थिती असतानाच दुसरीकडे मात्र महापालिकेच्या कार्यालयात कोणतीही गरज नसताना पेव्हरब्लॉकचे काम करण्यात आले आहे. आर्थिक अडचणींचा बहाणा करणाऱ्या महापालिकेला हे काम प्राधान्याने घेण्याची गरज काय होती ? यामागील मात्र गौडबंगाल अद्याप बाहेर आलेले नाही.

पोलीस कॉलनी समोरचा रस्ता

महापालिका कार्यालयात नगररचना विभाग आणि मुख्य इमारतीच्या मधील एका जा- ये करण्याच्या रस्त्यावर हे पेव्हर ब्लॉकचे काम विक्रमी वेळेत पूर्ण करण्यात आले आहे . या कामाची अशी कोणती गरज होती की शहरातील रस्त्यातील खड्डे बुजवणे ही प्राथमिकता असताना अशा प्रकारे हा खर्च करण्यात आला आहे . नगर शहरातील रस्ते भयावह झाले असून काही ठिकाणी चक्क अर्धा हे एक एक फुटापर्यंतचे खड्डे पडलेले आहेत . अशा या खड्यांमुळे नागरिक अक्षरश: जीव मुठीत धरूनच चालत आहे मात्र महापालिकेच्या प्राथमिकता या वेगळ्याच दिसत आहेत.

लालटाकी

पाऊस येऊन गेल्यानंतर शहरातील सखल भाग जसे चौपाटी कारंजा, पटवर्धन चौक, नालेगाव , दिल्लीगेट इथे मोठ्या प्रमाणात पाणी वाहून येते . आधीच निकृष्ट पद्धतीने झालेले रस्ते हे या पावसात चक्क वाहून जातात आणि रस्त्याखालील दगड आणि माती उघडी पडते . सध्याच्या परिस्थितीत प्रचंड गर्दी असल्याने अक्षरश: धुळीचे साम्राज्य या भागांमध्ये झालेले आहे मात्र खड्डे बुजवण्यासाठी देखील महापालिकेला वेळ किंवा पैसा उपलब्ध होत नाही.

न्यू आर्टस् कॉलेज ते दिल्लीगेट

फक्त शहरात नव्हे तर उपनगरात देखील अशीच परिस्थिती असून नगरकरांना खड्ड्यात लोटून स्वतःची कार्यालये चकाचक ठेवून आपण नागरिकांना काय संदेश देऊ इच्छितो ? याचाही विचार डोक्यात येण्यापलीकडे महापालिकेचे अधिकारी गेलेले असल्याने महापालिकेच्या या कामावर संताप व्यक्त केला जात आहे.

औरंगाबाद रोड येथील मनपा कार्यालयात करण्यात आलेले काम