श्रीपाद छिंदमच्या हातात पुन्हा बेड्या ,अखेर ‘ ते ‘ प्रकरण पडले भारी

छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱ्या श्रीपाद छिंदमला एका ज्युस सेंटर चालकास जातीवाचक शिवीगाळ केल्याने अटक करण्यात आली आहे. श्रीपाद छिंदम आणि त्याचा भाऊ श्रीकांत छिंदम या दोघांनाही तोफखाना पोलिसांनी जेरबंद केले आहे. एका ज्युस चालकाला शिविगाळ केल्याचं प्रकऱण कोर्टात पोहचलं होतं, जिथं छिंदम आणि त्याच्या भावाने जामीनासाठी अर्ज केला होता मात्र त्याचा अर्ज कोर्टाने फेटाळला आणि त्याच्या अटकेचा मार्ग मोकळा झाला. पोलिसांनी तडक कारवाई करत त्याला गजाआड केले आहे .

नगर शहरातील दिल्लीगेट येथील एका दिल्ली गेट भागात ज्युस सेंटर चालकाला माजी महापौर श्रीपाद छिंदम आणि श्रीकांत छिंदम यांनी दमदाटी करत जुलै महिन्यात जातीवाचक शिविगाळ केली होती. ज्युस सेंटर चालकाने पोलिसात धाव घेतली मात्र प्रकरण कोर्टात गेल्यावर छिंदमने न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला. मात्र हा अर्ज न्यायालयाने फेटाळला. यानंतर तोफखाना पोलिसांनी छिंदमला अटक केल्याची माहिती पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी दिली आहे. सदर प्रकरणात आरोपी असलेल्या इतर दोन जणांना सशर्त जामीन दिला आहे मात्र श्रीपाद छिंदम आणि श्रीकांत छिंदम यांना जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द उच्चारून श्रीपाद छिंदम चर्चेत आला होता . उपमहापौरपदी असताना भाजपमध्ये असलेल्या छिंदमची त्यानंतर पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची बातमी आली होती मात्र त्यानंतर देखील श्रीपाद छिंदमची शहरात दादागिरी (कोणाचा राजकीय वरदहस्त ? ) वाढतच होती.अहमदनगर निवडणुकीवेळी त्यांने ईव्हीएमची पूजा केली होती तर भाजप सत्तेत असताना त्याला देण्यात आलेले पोलीस संरक्षण हा देखील शहरात मोठा चर्चेचा विषय ठरलेला होता .आश्चर्याची गोष्ट म्हणजे श्रीपाद छिंदम अहमदनगर महापालिकेच्या निवडणुकीला पुन्हा उभा राहिला होता तरीही अपक्ष उभ्या राहिलेल्या छिंदमचा निवडणुकीत जातीनिहाय समीकरणामुळे विजय झाला होता.

महापालिकेत निवडून आल्याने त्याला आमदार होण्याची देखील स्वप्ने पडू लागली मात्र कोणत्याच पक्षाने त्याला तिकीट दिले नाही त्यानंतर त्याने कसे बसे करत बसपाचे तिकीट मिळवले मात्र त्याचा हा ओव्हर कॉन्फिडन्स नडला आणि नगरच्या मतदारांनी त्याला साफ नाकारले. नगरसेवक होण्यासाठी ठराविक भागातील एकगठ्ठा मतदान त्याला झाल्याने तो नगरसेवक म्हणून विजयी झाला मात्र विधानसभेत मात्र मतदारांनी साफ नाकारल्यामुळे तो विधीमंडळाची पायरी चढू शकला नाही.

सध्याचे प्रकरण काय आहे ?

शिवद्रोही श्रीपाद छिंदमने एका टपरी चालकाला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून दमदाटी करत तसंच जातीवाचक शिव्या दिल्याप्रकरणी त्याच्यासह 4 जणांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता . अहमदनगरच्या तोफखाना पोलीस स्टेशन मध्ये अॅट्रॉसिटीसह विविध कलमांतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला होता .सदरची घटना 9 जुलै 2021 दिवशी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली होती .