पुणे हादरले.. ‘ माझ चुकलंच चल हॉटेलला जाऊ ‘ म्हणत गाडीत बसवले आणि ..

पुणे शहरात रोज धक्कादायक घटना उघडकीस येत असताना भारती विद्यापीठ परिसरात एका प्रियकराने प्रेयसीची चाकूने बार करून हत्या केली आहे. रविवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास कात्रज नवीन बोगद्याजवळ ही घटना घडली होती. सपना दिलीप पाटील (वय 32, रा. पवार हॉस्पिटलजवळ, बालाजीनगर, कात्रज) असं खून झालेल्या तरुणीचं नाव असून रामकिसन गिरी (वय 36, रा. परभणी) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे.

उपलब्ध माहितीनुसार, सपना कात्रज येथील रिलायन्स मार्टमध्ये सफाई कामगार म्हणून काम करीत होती तर रामकिसन हा एका हॉटेलमध्ये कामाला होता. त्यांचे मागील 5 ते 6 वर्षांपासून प्रेमसंबंध होते मात्र काही दिवसांपूर्वी त्यांच्यात किरकोळ कारणावरुन भांडणं झाली होती. त्यानंतर पुन्हा प्रेमात आल्याचा बहाणा करीत त्याने सपनाला भेटण्यासाठी राजी केले आणि रविवारी रामकिसन प्रवासी कार भाड्याने घेऊन रिलायन्स मार्ट येथे गेला. तिथे गेल्यानंतर सपनाला जेवण करण्यासाठी त्याने बाहेर नेलं. त्यानंतर त्याने कार चालकास नवले पूलापासून कात्रज नवीन बोगद्याकडे गाडी घेऊन जाण्यास सांगितलं.

कात्रज नवीन बोगद्याकडे गेल्यावर घटनास्थळी दोघांमध्ये पुन्हा बाचाबाची झाली. त्यानंतर रामकिसनने त्याच्याकडील चाकूने तिच्यावर सपासप वार केले आणि त्यानंतर रामकिसन तेथून पळून गेला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सपनाला अखेर कार चालकाने शिंदेवाडी येथील रुग्णालयात नेले. तेथून तिला उपचारासाठी भारती विद्यापीठ रुग्णालयात हलविण्यात आले मात्र तोवर तिचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून रामकिसन यास अटक केली असून सदर प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत.