कंपनीच्या ‘ असल्या ‘ भन्नाट आकर्षक स्कीमला शेतकरी भुलले खरे मात्र लागला चुना

शतावरी आणि अश्वगंधा या औषधी वनस्पतींची लागवड करून येणारे पीक एकरी तीन लाख रुपये मोबदला देऊन विकत घेण्याची आश्वासन देत गुंतवणूकदारांची तब्बल 23 कोटी 45 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार पुणे जिल्ह्यात उघडकीस आला असून याप्रकरणी ऋषिकेश लक्ष्मण पाटणकर ( राहणार धायरी जिल्हा पुणे ) यास अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी राहुल शहा ( राहणार वाळवेकर, नगर पुणे ) यांनी फिर्याद दिली आहे

उपलब्ध वृत्तानुसार , तीन वर्षांपूर्वी पाटणकर याने शून्य हर्बल ऍग्रो डेव्हलपमेंट या कंपनीची स्थापना केली. कंपनीने प्रति एकर 50 हजार रुपये घेऊन सोलापूर सह अनेक शेतकऱ्यांच्या शेतात या वनस्पतींची लागवड केली आणि तयार केलेला माल देखील काढून नेला मात्र त्याचे पैसे शेतकऱ्यांना देण्यात आले नाही. गेल्या दीड ते दोन वर्षे शेतकरी हेलपाटे मारत होते त्यानंतर शेतकऱ्यांनी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांची देखील भेट घेतली तरीही काही उपयोग झाला नाही. शेवटी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना भेटून शेतकऱ्यांनी हकीगत सांगितली त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने तपास करून ऋषिकेश पाटणकरला अटक केली आहे.

अशी होती कंपनीची योजना

शेतकऱ्याच्या शेतात लावलेले पीक काढल्यानंतर ते पीक आम्ही स्वतः विकत घेऊ आणि शेतकऱ्यांना दर वर्षी एकराला तीन लाख रुपये मोबदला देऊ, असे पाटणकर याच्या कंपनीने शेतकऱ्यांना आमिष दाखवले होते. त्याच्या या आमिषाला अनेक लोक भुलले आणि त्यांनी पाटणकर याच्या या योजनेत रस दाखवला. त्यानंतर सुरुवातीला डिपॉझिट म्हणून कंपनीकडे एकरी पन्नास हजार रुपये आधी जमा करायचे त्यानंतर कंपनी शेतकऱ्यांना रोपे आणि खते देणार आणि मालाचे पैसे जागेवर माल काढल्यानंतर देणार, अशी आश्वासने दिली होती. मात्र प्रत्यक्षात माल घेऊन गेल्यानंतर देखील शेतकऱ्यांच्या हाती पैसे आले नाहीत, अशाप्रकारे शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याने पाटणकर याला अटक करण्यात आली आहे