नगर शहरातील बायोगॅसच्या ठेकेदाराचे मीठ नेमके कुणाला ? मनपाकडून नियम फाट्यावर

ठेकेदाराची मुदत संपण्याआधीच नव्याने ठेकेदार नियुक्त करण्यासाठी साधारणपणे निविदा मागवण्यात येतात मात्र नगर महापालिकेत याच्या उलट अजबच कारभार सुरू आहे. बायोगॅस प्रकल्प चालवत असलेल्या ठेकेदाराला महापालिका अधिकाऱ्यांचे संरक्षण प्राप्त असून दोन महिने उलटून देखील निविदा प्रसिद्ध केली गेली नाही त्यामुळे या ठेकेदाराचे महापालिकेतील नेमके कुठे लागेबांधे आहेत, याची चर्चा परिसरात नगर शहरात चांगलीच रंगली आहे

नगर महापालिकेने शहरातील व्हेज आणि नॉनव्हेज वेस्ट मटेरियलवर प्रक्रिया करण्यासाठी हा बायोगॅस प्रकल्प उभारला आहे. सुमारे तीन कोटी रुपये खर्च केल्यानंतर प्रकल्प ठेकेदाराला चालवण्यास देण्यात आला होता. त्या ठेकेदाराची मुदत देखील 31 जुलै रोजी संपली मात्र मुदत संपण्याच्या एक महिना आधी नवीन ठेकेदार नियुक्त करण्यासाठी किंवा रीतसर प्रक्रिया प्रमाणे निविदा प्रसिद्ध करून त्यातून ठेकेदाराची निवड होणे क्रमप्राप्त असते, मात्र सर्व नियम फाट्यावर मारत महापालिकेच्या स्वच्छता विभागाने अद्यापही नव्याने ठेकेदार नियुक्त करण्यासाठी निविदा मागवल्या नाहीत .

महापालिका दरमहा प्रकल्पचालक चालक संस्थेस दोन लाख साठ हजार रुपये एवढी घसघशीत रक्कम देते. पूर्वीच्याच ठेकेदाराला मुदतवाढ देऊन हा प्रकल्प कोणाच्या आशीर्वादावर त्याच ठेकेदाराला पुन्हा चालवण्यास दिलेला आहे, याचे कारण मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. इतर प्रकल्प चालकांची मुदत संपल्याने निविदा मागवल्या गेल्या मात्र केवळ बायोगॅस प्रकल्पासाठी नव्याने निविदा मागवल्या गेल्या नाहीत त्यामुळे ठेकेदाराला देखील कुठलेच भय राहिलेले नसून नव्याने निविदा न मागवण्यामागे काय कारण आहे ? हा प्रश्न नगरकरांना पडला आहे.

महापालिका अधिकाऱ्यांचे कारनामे नगर शहरात चांगलेच चर्चेत राहिलेले आहेत. माहिती अधिकाराला वेळेत उत्तर न देणे, वेगवेगळी उत्तरे देऊन अर्जदाराची दिशाभूल करणे असे अनेक प्रकार या आधी देखील घडलेले आहेत. महापालिका अधिकाऱ्यांच्या रंगेलपणाची देखील शहरात काही काळ जोरदार चर्चा होती. त्यातच हा नवीन प्रकार उघडकीस आल्याने यामागचे खरे सूत्रधार कोण हा प्रश्न जनतेला पडलेला आहे