महाराष्ट्र हादरला..भूत काढण्याच्या नावाखाली महिलेला मंदिरात बोलवले आणि..

देशात अंधश्रद्धेतून नरबळी सारखे धक्कादायक प्रकार घडलेले असताना नालासोपारा इथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे .अंगातलं भूत काढण्याच्या नावाखाली नालासोपाऱ्यात एक भोंदू बाबाने महिलेला अमानुषपणे मंदिरात मारहाण केल्याचा एक व्हिडीओ परिसरात व्हायरल झाला . अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी नालासोपारा पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर त्याच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून समितीकडून पुरावा म्हणून या प्रकाराचा व्हिडीओ पोलिसांना देण्यात आला आहे .अंनिसच्या तक्रारीवरुन महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट, अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध करणेबाबत आणि त्याचे समूळ उच्चाटन करणेबाबत अधिनियम 2013 चे कलम 3 प्रमाणे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण ?

नालासोपारा पश्चिमेकडील निळेमोरे गावाजवळील आदिवासी पाड्यात श्री भैरवनाथ बाबा नावाचे मंदिर आहे. मंदिराचा बाबा याच मंदिरात आपली भोंदूगिरी चालवत असून लोक देखील भुताच्या भीतीने या बाबाच्या पायी माथा टेकवतात. त्याचाच फायदा घेत या बाबाने पीडित महिलेला मारहाण केली. महिलेच्या अंगात भूत शिरलयं आणि ते काढण्यासाठी भोंदू बाबा तिला मारहाण करतोय. तिच्या अंगावर पाणी फेकतोय, तिच्या कपाळावर इबित लावतोय, असे त्याचे हे प्रकार काही जागरूक नागरिकांनी कॅमेरामध्ये कैद केले आणि हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला .

ज्या महिलेला मारहाण झाली ती महिला याच मंदिराच्या बाजूला एका पत्र्याच्या घरात राहते.भोंदू बाबाच्या दाव्यानुसार, ‘ या महिलेचा पतीच तिला या बाबाकडे घेऊन आला होता. हे मंदिर 1988 पासून आहे. कुणालाही भूतबाधा, करणी झाली तर लोक घेऊन येतात, मी त्यांना मंतरतो आणि ते बरे होतात. या महिलेच्या अंगात देखील भूत आले होते, ‘ असेही या बाबाचे म्हणणे आहे . सदर बाबाचा हा उद्योग गेल्या १०-१२ वर्षांपासून सुरु असून घटना नालासोपारा पश्चिमेकडील निळेमोरे गावाजवळील आदिवासी पाड्यात घडलेली आहे .

मुंबईला काम करणारी ही महिला मानसिक आजारी आहे मात्र भोंदू बाबाकडे गेल्यावर बाबाने तिच्या घराच्या बाजूला राहणारा एक मुलगा जो चार महिन्यांपूर्वीच तलावात बुडून मृत झालाय त्याचा भूत तिच्या अंगात चढल्याचा जावई शोध लावला आणि त्यानंतर बाबाने महिलेला अमानुष मारहाण सुरु केली. त्या महिलेला देखील काहीच कळलं नाही. मात्र एका सुज्ञ नागरीकाने या मारहाणीचा व्हिडीओ काढून या भोंदू बाबाचा भंडाफोड केला आहे. सदर भोंदू बाबा भूत काढण्याच्या नावाखाली महिला, लहान मुलं पुरुष यांना मारहाण करत असल्याच सांगण्यात आले आहे तसेच कोणी आवाज उठवला तर धर्माचा बागुलबुवा पुढे करून त्याला वेगळे वळण देण्याचा प्रयन्त या बाबाकडून करण्यात येत असल्याने कोणी याबद्दल बोलत नाही, असेही नागरिक म्हणाले आहेत.