नरेंद्र मोदींचा ‘ हा ‘ गुण आपल्याला सर्वाधिक आवडतो , प्रीतम मुंढेंकडून मोदींचे कौतुक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 7 वर्षात एकदाही पत्रकार परिषद घेतली नाही. त्यामुळे त्यांच्यावर सगळीकडून टीका होत असली तरी भाजपच्या खासदार प्रीतम मुंढे यांनी मात्र नरेंद्र मोदी यांचा हाच गुण आपल्याला सर्वाधिक आवडत असल्याचे म्हटले आहे . मुंडे यांच्या या विधानावर आश्चर्य व्यक्त केलं जात असून मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या कार्यक्रमात बोलताना प्रीतम मुंडे यांनी हे विधान केलं आहे.

प्रीतम मुंढे म्हणाल्या की, ‘ मोदींचा मला सर्वात जास्त आवडणारा गुण म्हणजे त्यांनी गेल्या सात वर्षात एकदाही पत्रकार परिषद घेतली नाही. त्यांनी पत्रकार परिषद घेतली नाही म्हणून त्यांच्यावर टीका झाली. पण ते आपलं काम करत आहेत. आपल्या मार्गावर मार्गक्रमण करत आहेत.मोदींबद्दल चांगलं बोलणारे दहा लोकं असतील तर टीका करणारे चारदोन लोक असतातच मात्र त्या टीकेने मोदी विचलीत होत नाहीत. ते आपलं काम करत राहतात ‘

प्रीतम मुंढे यांनी बीड राष्ट्रवादी मुक्त करण्याचा निर्धार देखील यावेळी व्यक्त केला. बीड जिल्ह्याला भ्रष्टाचारी राष्ट्रवादीपासून मुक्त करायचं आहे. त्यासाठी सर्वांनी झटून काम करावं, असं आवाहन त्यांनी केलं. सध्या कंत्राटदारांना हाताशी धरून आपणच काम केल्याचा आव आणला जात आहे. तशा बातम्याही पेरल्या जात आहेत. ज्या रस्त्याशी ज्यांचा संबंध नाही, त्या रस्त्याच्या कामाचं श्रेयही हे लोक घेत आहेत, असा चिमटाही त्यांनी राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांना काढला.