नगरच्या बेपत्ता अधिकाऱ्याचा अखेर मृतदेहच सापडला, पत्नीने केले गंभीर आरोप..

शेअर करा

अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातुन ब्रेकिंग न्यूज आली असून तालुक्यातील खांडगाव – वडघुल या गट ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवक झुंबर मुरलीधर गवांदे यांनी सौताडा धबधब्यावरुन उडी मारून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे . तब्बल आठ दिवसांनी त्यांचा मृतदेह मिळून आला आहे. गवांदे यांची बॅग, आयकार्ड, मोटरसायकल मिळाली होती मात्र आठ दिवसांपासून त्यांचा शोध सुरू होता.

काल दुपारी त्यांचा मृतदेह आढळून आला. बीड तालुक्यातील सौताडा पोलीस ठाण्यात आकस्मात अशी मृत्यूची नोंद झाली आहे मात्र खांडगाव – वडघुलचे उपसरपंच राम घोडके यांच्या त्रासला कंटाळून गवांदे यांनी आत्महत्या केल्याचा आरोप होत असून दोषींवर कारवाईचे करण्याची मागणी मयताच्या पत्नीने केली आहे.

उपसरपंच राम घोडके आणि ग्रामसेवक झुंबर गवांदे यांच्या संभाषणाच्या रेकॉर्डिंग व्हायरल झाल्या असून फॉरेस्ट हद्दीत असलेल्या दिडशे घरांची नियमबाह्य नोंद लावण्यासाठी उपसरपंच राम घोडके यांच्याकडून ग्रामसेवक झुंबर गवांदे यांच्यावर दबाव टाकण्यात येत असल्याच्या या क्लिप्स आहेत.ग्रामसेवक झुंबर गवांदे यांच्या विरोधात उपसरपंच रामा घोडके यांनी वरिष्ठांकडे तक्रार केली होती. तक्रार मागे घ्यायची असेल तर ही कामे करा, असे संभाषण आहे. या घटनेने संपूर्ण नगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

काय आहे प्रकरण ?

झुंबर गवांदे हे मांडवगण येथील घरातून 24 सप्टेंबर रोजी निघून गेले होते, याबाबतची तक्रार झुंबर गवांदे यांची पत्नी मनीषा गवांदे यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दिली होती . झुंबर गवांदे यांना काही दिवसापूर्वी वडघूल येथील एका पदाधिकाऱ्याने अपमानास्पद वागणूक दिली होती. तेव्हापासून ते बेचैन झाले होते, त्यांनी त्या संदर्भात गटविकास अधिकारी गोरख शेलार यांना याची कल्पना दिली होती तसेच रजेचा अर्ज देखील केला होता मात्र पंचायत समितीने रजेचा अर्ज स्वीकारला नाही. हताश झालेल्या गवांदे यांनी नंतर तो अर्ज पोस्टाने पाठवला होता.

माझ्या पतीने पाण्यात उडी मारून आत्महत्या केली असती तर दोन किंवा तीन दिवसात त्यांचा मृतदेह आढळून आला असता मात्र अद्यापपर्यंत त्यांचा मृतदेह देखील सापडलेला नाही त्यामुळे या घटनेचा लवकरात लवकर तपास लावावा अशी मागणी झुंबर गवांदे यांची पत्नी मनीषा गवांदे यांनी केली होती. गवांदे यांचा मृत्यूचा छडा लावावा म्हणून श्रीगोंदा पंचायत समिती मधील कर्मचाऱ्यांनी दोन दिवस काम बंद आंदोलन देखील केले होते .


शेअर करा