अनैतिक संबंधातून महिलेची हत्या ? नातेवाईक म्हणाले ‘ आम्ही ओळखत नाही ‘

शेअर करा

महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना उघडकीस येत असून अशीच एक घटना धुळे-सोलापूर महामार्गावर रांजणी येथील सर्विस रस्त्यालगत उघडकीस आली आहे. बीड जिल्ह्यातील गेवराई नजीक ही घटना उघडकीस आली असून रस्त्यालगतच्या नाल्यात एका अनोळखी महिलेचा सांगाडा शुक्रवारी आढळून आला आहे. नाकातील नथी मुळे या महिलेची ओळख पटली असून ती मूळची जालना जिल्ह्यातील असल्याचे स्पष्ट झाले आहे. अनैतिक संबंधातून तिची हत्या केली गेली असा संशय असून पोलिस तपास सुरू असल्याचे समजते.

उपलब्ध वृत्तानुसार, राधा माणिक गायकवाड ( वय 35 राहणार इंदेवाडी तालुका जालना ) असे या महिलेचे नाव असून ती बेपत्ता असल्याची तक्रार तिची बहीण विजया बबन चिरके ( राहणार सामनगाव तालुका जालना ) यांनी दिली होती. राधा गायकवाड विधवा असून तिला एक मुलगी व एक मुलगा आहे. इंदेवाडी इथे ती एकटीच राहत होती. राधा गायकवाड च्या पतीचे निधन झालेले आहे, त्यानंतर ती एकटी राहत असताना गावातीलच एका वाहनचालकाचे तिच्या सोबत अनैतिक संबंध सुरू झाले. त्यातून त्याने तिला बीड जिल्ह्यात आणले आणि तिची हत्या करून प्रेत महामार्गानजीक फेकून पोबारा केला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे

घटनास्थळी पोलिसांना मयत राधाच्या नाकातील नथ, पायातील पैंजण, कर्णफुले आणि साडी आढळून आली. हे साहित्य नातेवाईकांना दाखवले असता सुरुवातीला त्यांनी ते राधाचे नाहीत असे पोलिसांना ठामपणे सांगितले, मात्र नथीवरून ओळख पटवण्यात आली आणि तो मृतदेह राधा हीचा असल्याचे स्पष्ट झाले.

राष्ट्रीय महामार्गालगतच्या सर्विस रस्त्यावरील नाल्यातून दुर्गंधी येऊ लागल्याने स्थानिकांनी तिथे जाऊन पाहिले, त्यावेळी त्यांना एका कापडात अनोळखी महिलेचा सांगाडा आढळून आला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह कुजलेला असल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांना पाचारण करून जागेवरच उत्तरीय तपासणी करण्यात आली. डीएनए आणि न्यायवैद्यक चाचणीसाठी अंबाजोगाई येथे सांगाडा पाठवण्यात आलेला आहे.


शेअर करा