आर्यन खानला फरफटत नेणारा अधिकारी नव्हे तर भाजपचा कार्यकर्ता ? , पुराव्यासहित मोठा दावा

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला मुंबईतील समुद्रात क्रूझवर झालेल्या ड्रग्ज पार्टी प्रकरणात एनसीबीनं अटक केली आहे. आतापर्यंत या प्रकरणात ११ जणांना अटक झालेली आहे. पण या प्रकरणाला आता वेगळच वळण मिळालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. एनसीबीनं क्रूझवर केलेली छापेमारी बनावट असल्याचा धक्कादायक आरोप मलिक यांनी केला असून तसे पुरावे देखील त्यांनी दिले असल्याने राज्यात एकच खळबळ उडालेली आहे .

आर्यन खान याला पकडून घेऊन जाणाऱ्या एनसीबी अधिकाऱ्याचा आर्यनसोबतचा एक सेल्फी प्रचंड व्हायरल झाला होता. त्यानंतर एनसीबीनं अधिकृतरित्या प्रतिक्रिया देत संबंधित व्यक्ती एनसीबीचा अधिकारी नसल्याचं म्हटलं होतं. याच मुद्द्यावरुन नवाब मलिक यांनी आर्यन खानला पकडून एनसीबीच्या कार्यालयात घेऊन जातानाच्या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीची कुंडलीच सादर केली आहे.

नवाब मलिकांनी आज मुंबईत याप्रकरणी एक पत्रकार परिषद घेतली. मलिक यांनी काही व्हिडिओ आणि फोटो सादर करत आर्यन खानला पकडून घेऊन जाणारा व्यक्ती नेमका कोण आहे याची माहिती दिली. आर्यन खान याला अटक केल्यानंतर एनसीबीच्या कार्यालयात घेऊन जातानाचा एक व्हिडिओ एएनआयनं जारी केला होता. यात जो व्यक्ती आर्यन खान याला पकडून घेऊन जाताना दिसतोय या व्यक्तीचं नाव किरण गोसावी असल्याचा खुलासा नवाब मलिक यांनी केला आहे.

किरण गोसावी याचे काही फोटो नवाब मलिक यांनी यावेळी पत्रकार परिषदेत जारी केले आहेत. यात किरण गोसावीचे हातात पिस्तुल घेतलेले आणि मोबाइलवर बोलतानाचे फोटो दाखवण्यात आले आहेत. तसंच त्याचं फेसबुक अकाऊंटही मलिकांनी दाखवलं. यात केपी गोसावी असं नाव फेसबुक अकाऊंटवर आहे. खासगी गुप्तहेर असल्याचं गोसावीनं फेसबुकवर म्हटलं आहे मात्र तो भाजपासाठी काम करत असल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे. किरण गोसावी विरोधात पुण्यात एका तरुणाची नोकरी देण्याच्या बहाण्यानं फसवणुक केल्याची तक्रार दाखल आहे. किरण गोसावी तरुणांना परदेशात नोकरीचं आश्वासन देऊन फसवणूक करणारा व्यक्ती आहे, असंही मलिक म्हणाले.

आर्यन खानसोबत सेल्फी घेतलेला व्यक्ती एनसीबीचा अधिकारी नसल्याचं स्पष्टीकरण एनसीबीनं दिलं होतं. मग तो व्यक्ती कोणत्या अधिकारानं आर्यन खानला पकडून एनसीबीच्या कार्यालयात घेऊन गेला? तो जर एनसीबीचा अधिकारी नाही. मग तो नेमका कोण? त्याचा एनसीबीच्या झोनल डायरेक्टरशी संबंध काय? असे सवाल नवाब मलिक यांनी केले आहेत.