मोठी बातमी..वरूण गांधींनी ‘ भाजप ‘ शब्द हटवला , शेतकरी चिरडल्याचा व्हिडीओ केला शेअर

शेअर करा

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे रविवारी भाजप नेते आणि शेतकरी यांच्यात झालेल्या हिंसाचारामुळे अजूनही तणावाचं वातावरण आहे.घटनेत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या परिवारांची राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी भेट घेतली आहे . दुसरीकडे वरूण गांधी हे भाजपमध्ये असले तरी त्यांनी आपल्या ट्विटर हॅण्डलवरून भाजप शब्द हटवला आहे. उत्तर प्रदेश आणि केंद्र सरकारवर विरोधक आक्रमक झाले असून शेतकऱ्यांवर गाडी चढवलेले हे प्रकरण उत्तर प्रदेशात भाजपचे मोठे नुकसान करण्याचा अंदाज आहे .

भारतीय जनता पक्षाचे खासदार वरून गांधी यांनी ही लखीमपुर खेरीमध्ये झालेल्या हत्येच्या संदर्भातील व्हिडिओ आपल्या ट्विटर हँडवर पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ अधिक धक्कादायक आहे.सदर व्हिडीओत काळ्या रंगाची एसयुव्ही वेगानं येताना दिसतेय. त्यानंतर ती कार शेतकऱ्यांना चिरडून पुढे जात असल्याचं दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये भरधाव वेगाने जाणारी कार पटकन शेतकर्‍यांवर चढते आणि पुढे जाते. त्याच्या मागे आणखी दोन गाड्या जाताना दिसतात आणि घटनेनंतर लगेचच लोक इकडे -तिकडे धावताना दिसत आहेत.

https://twitter.com/varungandhi80/status/1445953332384698369

लखीमपूर खीरीचे दोन वेळा खासदार राहिलेले आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांच्या मूळ बनबीरपुर गावात उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य रविवारी येणार होते, याचाच विरोध शेतकरी करत होते मात्र यादरम्यानच मिश्रा यांचा मुलगा ज्या एसयूव्हीमध्ये बसला होता, त्याने शेतकऱ्यांना चिरडले आणि त्यात चार शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर उसळलेल्या हिंसाचारात आणखी चार जणांना जीव गमवावा लागला.

विरोधी पक्ष या घटनेसाठी भाजपला जबाबदार ठरवत आहेत. लखीमपुर खीरी येथे जाण्यासाठी लखनऊ विमानतळावर पोहोचलेल्या राहुल गांधींना आपल्या वाहनाने जाण्याची परवानगी देण्यात आली नाही. यामुळे याच्या विरोधात ते विमानतळाच्या परिसरातच धरणे आंदोलनाला बसले. यादरम्यान त्यांचा अधिकाऱ्यांसोबत वाद झाला मात्र काहीच वेळात प्रकरण शांत झालं आणि राहुल गांधी सीतापुरसाठी रवाना झाले. प्रियांका गांधी यांना देखील अटक करण्यात आली होती मात्र त्या देखील काही तासांनी पीडित परिवाराच्या घरी पोहचल्या .

3 ऑक्टोबर रोजी उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान लखीमपूर खीरी येथे घडलेल्या घटनेसंदर्भात एफआयआर नोंदवण्यासाठी गृह मंत्रालय आणि पोलिसांना निर्देश देण्याची मागणी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. मंत्र्यांना शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी यात करण्यात आली आहे. सरन्यायाधीश एन व्ही रमाना यांचं खंडपीठ आज (गुरुवारी) या प्रकरणावर सुनावणी करणार आहे. सुनावणी सीजेआयच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय खंडपीठाद्वारे होणार आहे.


शेअर करा