कोरोनामुळे मयत व्यक्तींच्या वारसांना ‘ मदतीचे घोडे ‘ नक्की कुठं अडलंय ? सविस्तर बातमी

कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर मृत्यू प्रमाणपत्रावर कोरोनाचा उल्लेख नसला तरी 50 हजार रुपयांची मदत मिळणार , हा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. रुग्णाच्या नातेवाईकांना या आदेशाने दिलासा मिळाला असला तरी अद्याप देखील मदत मिळण्याची शक्यता कमीच दिसत आहे. केंद्र व राज्य यांच्याकडे मयत व्यक्तीचे वारस आशेने पाहत आहेत तर या दोन्ही सरकारमध्ये समन्वय नसल्याने वारस परिवाराची अक्षरश: हेळसांड झालेली पहायला मिळते आहे .

मार्च २०२० पासून नगर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झालेला होता. आतापर्यंत साडेतीन लाख लोकांना कोरोना होऊन गेला तर जिल्ह्यातच साडेसहा हजारापेक्षा जास्त नागरिक मृत्युमुखी पडलेले आहेत. कोरोनामुळे नागरिकांचे अर्थचक्र आणि जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेले आहे. अनेक जणांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत, रोजगार बुडाले आहेत त्यामुळे कोरोनात मृत्यू झालेल्या व्यक्तींचे कुटुंब रस्त्यावर देखील आलेले आहे, अशा परिस्थितीत केंद्र सरकारने कोरोनाने मृत्यू पावलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना एनडीआरएफ आणि एसडीआयएफ मधून 50 हजार रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा केलेली आहे.

नवीन निर्णयानुसार मृत्युपत्रात कोरोनाचा उल्लेख नसेल तरीही मदत देण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे, त्यामुळे कोरोनाने मयत पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना ऐकीव दिलासा मिळाला असला तरी स्थानिक पातळीवर काहीच आदेश अद्याप आलेले नसल्याने मयत व्यक्तीचे कुटुंबीय हतबल झालेले पाहायला मिळत आहे. काही रुग्णांवर कोरोनाच्या काळात दवाखान्यात मनमानी पद्धतीने पैसे आकारून मयत व्यक्तीच्या कुटुंबीयांची अक्षरशः चार चार पाच पाच लाखांची लूट केली मात्र तरीदेखील रुग्ण वाचला नाही, आता हे 50 हजार रुपये घेऊन आम्ही काय करणार आणि ते कधी येणार ? याविषयी देखील नागरिकांच्या मनात संभ्रम निर्माण झालेला आहे .

न्यायालयाने आदेश दिले तर ते अमलात आणण्यासाठी केंद्राची इच्छाशक्ती दिसत नाही आणि राज्यावर जबाबदारी लोटून केंद्र सरकार जबाबदारी झटकत आहे तर राज्य सरकार आर्थिक अडचणीचे कारण सातत्याने पुढे करत आहे, त्यामुळे मयत व्यक्तीच्या नातेवाईकांच्या नशिबी निव्वळ घोषणाच येत आहे मात्र प्रत्यक्षात मदत आलेली नाही. जिल्हा पातळीवर देखील प्रशासनाला या संदर्भात कोणतेही आदेश वरून आलेले नाही त्यामुळे जरी निर्णय झाला तर मदत केव्हा मिळणार असा प्रश्न निर्माण झालेला आहे.

आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ‘ अद्याप कोणतीही प्रक्रिया जिल्हास्तरावर सुरू झालेली नाही. केंद्र सरकारने कोरोनाने मृत्यू पावलेल्या रुग्णांच्या वारसांना मदत देण्याचा निर्णय जरी घेतला असला तरी या निर्णयाचा अद्याप अध्यादेश जारी झालेला नाही त्यामुळे हा अध्यादेश अद्याप प्रशासनापर्यंत पोचलेला नाही. ‘ केंद्राचीही आर्थिक मदत निव्वळ दिवास्वप्नच ठरण्याची चिन्हे असून आधीच दुःखात असलेल्या नागरिकांच्या जखमेवर मीठ चोळणे तरी केंद्राने बंद करावे, असे मयत व्यक्तींच्या वारसांचे म्हणणे आहे .