नागपूर हादरले..भाडेकरूचा ‘ तो ‘ त्रास असह्य , मालकाची व्हिडीओ व्हायरल करून आत्महत्या

भाडेकरूचा त्रास असह्य झाल्याने नागपूर शहरातील जरीपटका येथे एका घरमालकाने चक्क गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने स्वतःचा व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केला आणि त्यानंतर आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. काही वेळातच हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शहरात खळबळ उडाली असून दुर्दैवाने या घर मालकाला वाचवण्यास सर्वांना अपयश आले.

मुकेश कुमार श्रीचंद रिजवानी ( वय 46 ) असे मयत घर मालकाचे नाव आहे. जरीपटका येथील कस्तुरबानगर मध्ये ते राहत होते आणि आणि नाष्टा सेंटर चालवून आपल्या परिवाराची गुजराण करत होते. याच दरम्यान रिजवानी यांनी आरोपी राजेश उर्फ राजा सेतिया ( वय 45 ) याला दोन खोल्या भाड्याने दिल्या होत्या, मात्र ठरल्याप्रमाणे आरोपी राजेश मुकेश यांना घरभाडे देत नव्हता. भाड्याची मागणी केली असता तो शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी देत होता.

आरोपी राजा सेतिया हा बुकी असून वाममार्गी असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात उघड झाले आहे. अनेकांना तो आणि त्याचा भाऊ यांनी अशाच पद्धतीने त्रास दिल्याची माहिती देखील प्राथमिक तपासात समोर आलेली आहे. मुकेश यांच्यासोबत त्याने असाच वेळोवेळी वाद घातला. त्यानंतर रिजवानी यांनी आरोपींना सप्टेंबरमध्ये घर खाली करून मागितले त्यावेळी घर खाली करून देण्यासाठी त्याने दहा लाखाची खंडणी मागितली. रिजवानी यांनी आरोपीला 60 हजार रुपये दिले व आणखी साडेचार लाख रुपये द्या तरच घर खाली करेल, अशी धमकी देत तो त्यांना छळवत होता. त्याचा मोठा भाऊ मुलचंद देखील अशाच पद्धतीने घरमालकाला त्रास देत होता.

दोघा भावांचा असा त्रास असह्य झाल्याने सहा ऑक्टोबरला संध्याकाळी मुकेश रिजवानी यांनी गळफास लावून आत्महत्या केली. त्यापूर्वी त्यांनी स्वतःचा व्हिडिओ बनवला आणि त्यासाठी सेतिया बंधू हे जबाबदार असल्याचे म्हटले आहे. रिजवानी यांनी एका वकिलाच्या देखील नाव घेतलेले असून हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कशिश रिजवान यांनी याबद्दल जरीपटका ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. आपल्या विरुद्ध तक्रार दाखल झाली हे समजतात दोघेही सेतिया बंधू फरार झालेले आहेत.