आरटीआय कार्यकर्त्याला धमकी प्रकरणात ‘ दिलीप सातपुते ‘ नावाची नगर शहरात जोरदार चर्चा

नगर शहरात वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव योगेश साठे यांना एका उपोषण प्रकरणात रस्त्यात अडवून धमकी देण्यात आल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. त्यानंतर साठे यांनी त्याची रीतसर तक्रार दाखल केली असून सदर प्रकरणाचा तपास सुरु असताना सोशल मीडियात एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत असून त्यात साठे यांना धमकी मिळाली म्हणून त्यांनी उपोषण मागे घेतले, असा धक्कादायक दावा करण्यात आलेला आहे. ‘ दिलीप सातपुते नामक व्यक्तीने साठे यांना धमकी दिली आणि त्यांनी उपोषण मागे घेतले , असे हा व्यक्ती सांगत असून सदर आवाज हा सागर चाबुकस्वार नावाच्या व्यक्तीचा असल्याचे योगेश साठे यांचे म्हणणे आहे. साठे यांच्या एका सहकाऱ्याशी बोलताना सागर चाबुकस्वार नावाच्या व्यक्तीने हा दावा केला असून नगरमध्ये ‘ दिलीप सातपुते ‘ नावाच्या व्यक्तीची चर्चा सोशल मीडियात सुरु झाली आहे .

योगेश साठे यांनी या प्रकाराबद्दल पोलिसात तक्रार दाखल केली असून ‘ दिलीप सातपुते ‘ कोण आहेत ? याचा पोलिसांनी शोध घेण्याची मागणी केली आहे सोबतच जीवन कांबळे या व्यक्तीने देखील सोशल मीडियात आपली बदनामी केली असल्याचे म्हटले आहे . नगर चौफेर सदर क्लिपमधील आवाज हे त्याच व्यक्तींचे आहेत याची पुष्टी करत नाही, मात्र सोशल मीडियात ही क्लिप चांगलंच व्हायरल होत असून माहिती अधिकार कार्यकर्त्याना कशा पद्धतीने नगरमध्ये दहशतीत काम करावे लागते, हे देखील या क्लिपच्या माध्यमातून समोर आले आहे .

योगेश साठे यांनी दाखल केलेली काय आहे तक्रार ?

मी अहमदनगर उपविभागीय अभियंता बांधकाम उपविभागाचे शाखा अभियंता सागर अर्जुन कोतकर यांच्याविरोधात सार्वजनिक बांधकाम खात्यांतर्गत त्यांच्या कार्यकाळातील झालेल्या कामाची चौकशी करून गुन्हा दाखल करून त्यांना तत्काळ निलंबन करावे या आशयाचे पत्र व तक्रार अर्ज सादर केले आले आहेत तसेच संबंधित सादर केलेल्या चौकशी व तक्रार अर्ज या कारणामुळे मला जीवे मारण्याची धमकी व माझ्या गाडीचे केलेले नुकसान या बाबींमुळे मी तोफखाना पोलीस स्टेशन अदखलपात्र नो.क्र.१२०६/२०२१ आय.पी.सी ४२७,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे.

जीवन कांबळे रा.इंद्रानगर केडगाव अहमदनगर मो.नं. ८४XXXXX आणि ९८XXXXXX या इसमाने मला फेसबुक व व्हॉट्स ॲप या माध्यमाद्वारे बदनामी करून तुला बघून घेतो,तुझी वरात काढतो,तसेच खंडणी मागतो,तू समाजासाठी कलंक आहे.अधिकाऱ्याला ब्लॅकमेल करीत आहे व घाणेरड्या अश्लील भाषेत शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी देत बदनामी केलेली आहे त्यामुळे माझ्या कुटुंबियांच्या व माझ्या जीवितास घातपात होऊन धोका निर्माण होऊ शकतो.

जीवन कांबळे याचा मित्र सागर चाबुकस्वार रा. नागरदेवळे,अहमदनगर याने देखील मो.नं.९६XXXXXXX वरून माझे सहकारी मित्र यांना फोन करून माझ्या बद्दल बदनामी कारक बोलणे करून मला दिलीप सातपुते यांनी उपोषण मागे घेण्यास भाग पाडले व दिलीप सातपुते यांनी ‘ मला उपोषण मागे घे नाहीतर तुझा कार्यक्रम करू ‘ , अश्या प्रकारे फोनद्वारे संभाषण केलेले आहे. सदर संभाषणच्या ऑडियो क्लिप मधील सागर चाबुकस्वार याने उल्लेख केलेली दिलीप सातपुते ही व्यक्ती कोण ? याचा तपास करून करून माझ्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यामागे जीवन कांबळे,सागर चाबुकस्वार व दिलीप सातपुते यांचे कट कारस्थान आहे असे दिसून येत आहे.

योगेश साठे यांनी बदनामी करण्यात आलेले फोटो आणि ऑडिओ क्लिप पोलिसांकडे सादर करत कारवाई करावी तसेच ‘ दिलीप सातपुते ‘ या व्यक्तीचा शोध घेण्याची मागणी केलेली आहे.