इनकम टॅक्स छापेमारीवर रोहित पवारांनी सोडले मौन, म्हणाले की ..

उगाचच राजकीय हेतूने त्रास देण्यासाठी छापेमारी केली जात असेल तर ते चुकीचे आहे. आपल्या कुटुंबियांना होणारा त्रास कुणालाही आवडत नाही. प्राप्तिकर विभाग कोणाच्याही घरी छापेमारी करू शकते मात्र राजकीय हेतू नसावा, असे मत आमदार रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले आहे

बारामती येथे रविवारी एका कार्यक्रमानंतर आमदार रोहित पवार माध्यमांशी बोलत होते. तेव्हा ते म्हणाले की, ‘ उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील राजकीय हेतूने कुटुंबियांना त्रास दिला जाऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. महाविकास आघाडी सरकार अतिवृष्टीच्या संकटावर मात करण्यासाठी प्रयत्न करत आहे. उद्या त्या त्या भागातील पंचनामे पूर्ण होत आहे. उपमुख्यमंत्र्यांनी कर्ज काढू पण शेतकऱ्यांना मदत करू ‘, असा शब्द दिलेला आहे.

क्रूज ड्रग्स प्रकरणावर बोलताना रोहित पवार म्हणाले की, ‘ ग्रामविकास मंत्री नवाब मलिक यांनी जो मुद्दा मांडला तो समजून घेतला पाहिजे. ज्या क्रूजवर शंभर-दीडशे मुले मुली होत्या त्यातील ठराविक लोकांनाच का पकडले. इतरांना कशाच्या आधारावर सोडले. याप्रकरणी कारवाई करताना भाजपाचे पदाधिकारी कसे काय उपस्थित होते ? ‘ असे प्रश्न सर्वसामान्य नागरिकाला पडल्यासारखे आहेत .