‘ हे लोक ‘ म्हणजे देशावरील ओझे , अमित शाह यांचे मोठे विधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 20 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्या निमित्त केंद्रीय गृहमंत्री आणि नरेंद्र मोदी यांचे गुजरातपासूनचे विश्वासू सहकारी अमित शाह यांची संसद टीव्हीकडून मुलाखत घेण्यात आली. मुलाखतीत अमित शाह यांनी अशिक्षित लोक हे एकप्रकारे देशावरील ओझं असल्याचं म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे .

काय म्हणाले अमित शाह ?

एक अशिक्षित व्यक्ती देशावरचं ओझं असतं. कारण त्याला ना संविधानाने दिलेल्या हक्कांची माहिती असते, ना देशाप्रती असलेल्या आपल्या कर्तव्यांची. त्यामुळे अशिक्षित व्यक्त एक चांगली नागरिक कशी होईल ?. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते त्यावेळी मुलं शाळांमध्ये जाण्याचं प्रमाण फारसं नव्हतं. मोदी यांनी त्यावेळी एखाद्या उत्सवाप्रमाणे मुलांना शाळेत टाकण्याची मोहीम सुरु केली. त्यासाठी त्यांनी पालकांचीच एक समिती नेमली. शिक्षकांच्या जबाबदाऱ्या वाटून दिल्या. त्यामुळे शाळेच्या बाहेर असलेल्या मुलांचं प्रमाण 36 टक्क्यांवरुन 1 टक्क्याच्याही खाली आले.

मोदींचं काम मी अगदी जवळून पाहिलं आहे. त्यांच्यावर हुकूमशाहीचे लावण्यात आलेले आरोप सर्व खोटे आहेत. तथ्यहीन आहेत. ते कोणत्याही बैठकीत अगदीच मोजके बोलतात. त्यानंतर सर्वांचं ऐकून ते निर्णय घेतात. कधी कधी तर एवढा काय विचार करायचा? एखाद्या विषयावर एवढी चर्चा कशाला करायची असं आम्हाला वाटतं. पण मोदी सर्वांचं ऐकून घेतात. छोट्या छोट्या विधानाचीही ते दखल घेतात आणि गुणवत्तेच्या आधारेच निर्णय घेतात. त्यामुळे मोदी निर्णय लादतात असं म्हणणं चुकीचं असून त्यात काहीच तथ्य नाही.

मोदी हुकूमशहासारखे वागतात असं परसेप्शन तयार करण्यात आलं आहे. एखाद्या फोरममध्ये जी चर्चा होते. ती बाहेर येत नाही. त्यामुळे लोकांना वाटतं मोदींनीच एकट्याने निर्णय घेतला. हा सामूहिक निर्णय असतो हे जनताच काय पत्रकारांनाही माहीत नसतं आणि स्वाभाविकपणे निर्णय तेच घेऊ शकतात. कारण जनतेने त्यांना तसा अधिकार दिला आहे. मात्र, सर्वांशी चर्चा करून, त्यांना बोलण्याची संधी देऊन, सर्वांचे मायनस, प्लस पॉइंट बघून ते निर्णय घेतात. काही लोक आमचे वैचारिक विरोधक आहेत. ते सत्य तोडूनमोडून सादर करतात. मोदींची प्रतिमा मलिन करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.