‘ शेतकऱ्यावर गाडी चढवली ‘ प्रकरणावर राधाकृष्ण विखे पाटलांनी सोडले मौन , म्हणाले ..

महाराष्ट्रातील शेतकरी व सामान्य जनता संकटामध्ये होरपळत असताना उत्तर प्रदेशातील जनतेचे तारणहार असल्याच्या अविर्भावात मंत्रिमंडळाच्या बैठकीत शोकप्रस्ताव संमत करणे हे महाविकास आघाडीचे सरकारचे निव्वळ ढोंग आहे. 1050 कोटी रुपयांच्या दलालीचे पुरावे आयकर खात्याला सापडल्याने जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी महाराष्ट्र बंद करण्यात आल्याचा आरोप भाजप नेते आमदार राधाकृष्ण विखे यांनी केला आहे .

राधाकृष्ण विखे यांनी एक पत्रक प्रसिद्ध केले असून या पत्रकात म्हटले आहे की, ‘ उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांविषयी कळवळा दाखवणाऱ्या महा विकास आघाडी सरकारने महाराष्ट्रातील संकटग्रस्त शेतकऱ्यांना वाऱ्यावर का सोडले ? नैसर्गिक आपत्तीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदतीच्या आश्वासनापलीकडे सरकारने काहीही दिलेले नाही. पीक विम्याचा लाभ देखील शेतकऱ्यांना मिळू शकलेला नाही. लखीमपुर-खीरी मध्ये काय झाले ? त्यावर काय कारवाई करायची यासाठी उत्तर प्रदेश सरकार सक्षम आहे. झालेली घटना दुर्दैवी आहे या घटनेचे समर्थन होऊ शकत नाही पण महाराष्ट्रात शेतकऱ्यांवर मरण ओढवत असताना त्यावर मात्र ठाकरे सरकार चकार शब्द बोलत नाही याचे आश्चर्य वाटत आहे.

राज्यातील सत्ताधारी नेते, सनदी अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराची हजारो कोटीची प्रकरणे रोज बाहेर येत आहेत. आयकर खात्याने अधिकृतपणे हा भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणला आहे. जनतेला तोंड दाखवायला देखील जागा राहिलेली नाही, असे अनेक जण चौकशीचा ससेमिरा चुकवण्यासाठी पळापळ करत आहेत. नवी प्रकरणे बाहेर येऊ लागल्याने अनेकजण धास्तावलेले आहेत आणि आपल्या भ्रष्टाचारावर पांघरूण घालण्यासाठी लखीमपूर प्रकरण महाराष्ट्रात पेटवून जनतेचे लक्ष अन्यत्र वळविण्याचा सरकारचा डाव आहे. सरकार जनतेसाठी काहीही करू शकत नाही, हे आघाडी सरकारने आपल्या नाकर्तेपणातून सिद्ध केले आहे.