उड्डाणपुलापाठोपाठ सुजय विखेंचा ‘ दुसरा ‘ मास्टरस्ट्रोक

नगर शहरातील गेली अनेक वर्षे रेंगाळत राहिलेला उड्डाणपुलाचा प्रश्न सुजय विखे यांनी पुढाकार घेत काही प्रमाणात का होईना मार्गी लावलेला आहे. संथ गतीने का होईना मात्र उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने नागरिकांची गैरसोय होत असली तरी विखे यांनी मार्गी लावलेल्या या कामाबद्दल नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

सुजय विखे यांनी अशाच पद्धतीने दुसरा एक मास्टरस्ट्रोक दिला असून नगर ते पुणे रेल्वे मार्गाचा आराखडा पंधरा दिवसात तयार करण्याच्या सूचना खासदार सुजय विखे यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना दिलेल्या आहे. आराखडा तयार झाल्यानंतर रेल्वे मंत्र्यांकडे पाठपुरावा करून लवकरच नगर ते पुणे रेल्वे सुरू करणार असल्याचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी सांगितले आहे.

नगर ते पुणे रेल्वे असावी अशी मागणी अनेक दिवसांपासून नगरकर करत आहे. नगरहून पुण्याला रोज अप-डाऊन करणारे अनेक नागरिक आहेत मात्र सातत्याची ट्राफिक जाम आणि इतरही अनेक अडचणी तसेच रोजचे महागडे भाडे अनेकांना परवडत नाही, त्यामुळे रेल्वेची मागणी गेले कित्येक दिवसापासून होत आहे.

सुजय विखे म्हणाले की, ‘ दौंड ते नगर हा रेल्वे प्रवास करून रेल्वे प्रशासनाकडून माहिती घेतली आहे. नगर पुणे रेल्वे मार्गाचा आराखडा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव व राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन सादर करणार आहे. नगर पुणे रेल्वे सेवा सुरू झाल्यानंतर शहरातील व जिल्ह्यातील युवक नागरिक आणि व्यवसायिक दररोज प्रवास करू शकतात त्यासाठी पास उपलब्ध करून दिले जातील आणि अवघ्या दोन तासात नगरकर पुण्यात पोहोचतील. केंद्र सरकारने दौंड इथे 30 कोटी रुपये खर्चून कोल्ड लाईन स्टेशन उभारले आहे ही सुविधा सुरू झाल्यानंतर नागरिकांना वाहतूक कोंडीच्या समस्यांना सामोरे जावे लागणार नाही तसेच आर्थिक बचत देखील होईल’