नगरला सिव्हिल हॉस्पिटलने हात वर केल्याने महिला म्हणाली ‘ देवाच्या दारात मरते ‘ अन त्यानंतर..

नगर जिल्ह्यात झालेल्या पावसाने अनेक ठिकाणी चिखल आणि मोठ्या प्रमाणावर गवत उगवलेले असल्याने साप व अन्यत्र प्राणी देखील बाहेर येऊ लागले आहेत. अशाच एका घटनेत नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी तलावातील एका महिलेला रविवारी दहा तारखेला साप चावला मात्र तिच्यावर उपचार करण्यास नगर जिल्हा रुग्णालयाने असमर्थता दर्शवली त्यामुळे अखेर आदिवासी समाजातील या महिलेला महिलेच्या म्हणण्याने देवाच्या दारात नेऊन सोडण्यात आले मात्र अखेर काही सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रकरणात लक्ष घातले आणि त्यांच्या प्रयत्नानंतर या महिलेला सिव्हिलला दाखल करण्यात आले.तब्बल पाच तास तडफडत ठेवून अखेर पाच तासांनी या महिलेला रुग्णालयात दाखल करून घेण्यात आल्याने सिव्हिल हॉस्पिटलचा भोंगळ कारभार पुन्हा समोर आला आहे .

उपलब्ध माहितीनुसार, अलका संतोष बर्डे ( वय 32) असे या महिलेचे नाव आहे आणि तलावाच्या कडेला पालामध्ये राहणाऱ्या या महिलेला पहाटेच्या सुमारास साप चावला. पतीने तात्काळ दुचाकीवरून आणत तिला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र कोरोनाचे कारण सांगून उपचार न करता त्यांना चक्क खाजगी रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. खाजगी रुग्णालयात गेल्यानंतर आधी दहा हजार रुपये भरा तर आम्ही दाखल करून घेऊ, असे सांगण्यात आले. हातावर पोट असलेल्या या आदिवासी कुटुंबाकडे पैसे नसल्याने दोघे देखील हतबल झाले.

पैशाची सोय होईना आणि सरकारी रुग्णालयात दाखल करून घेईना, अशा विवंचनेत सापडलेल्या या दाम्पत्याने अखेर सर्व काही देवावर सोडून देण्याचे ठरवले आणि आढाववाडी येथील बिरोबा मंदिरात या महिलेला आणून टाकण्यात आले. देवाच्या कृपेने सर्पदंश उतरत असल्याची अंधश्रद्धा अद्यापही ग्रामीण भागात आहे, मात्र जर सरकारी रुग्णालयात असे अनुभव येत असतील तर अशा प्रकारच्या अंधश्रद्धा आणखीन वाढण्याचा धोका निर्माण झालेला आहे.

सदर घटनेची माहिती डोंगरगणचे माजी सरपंच कैलास पठारे, बाळासाहेब पवार, रामदास बर्डे यांना समजताच त्यांनी तात्काळ 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेला बोलावले आणि सर्पदंश झालेल्या महिलेला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. केवळ कोणताही राजकीय वरदहस्त नव्हता म्हणून या महिलेला जिल्हा रुग्णालयाने उपचार करण्यास नकार दिल्याने तब्बल पाच तास रुग्णालयांच्या दाराचे तडफडत राहिल्याने या महिलेच्या जीविताला देखील धोका निर्माण झालेला होता. सरकारी हॉस्पिटल मधूनच जर खाजगी दवाखान्यात जाण्याचे सल्ले दिले जात असतील तर ही बाब देखील गंभीर आहे तसेच सर्पदंश झाल्यास औषधांची वानवा असेल तर सरकार नागरिकांच्या प्रति किती गंभीर आहे हे देखील या घटनेतून समोर आले आहे .