महापालिकेची ‘ ही ‘ कारवाई धडाकेबाज होणार की फक्त नोटिसा बजावून कर्मचारी परत फिरणार ?

नगर शहरासह उपनगरातील अनेक ठिकाणी भररस्त्यात गाया आणि म्हशी बसलेले चित्र नित्याचे झाले आहे, मात्र आता महापालिकेने अशा प्रकाराच्या विरोधात कारवाईचा बडगा उगारण्यात सुरुवात केली आहे. शहरातील गोठे मालकांना नोटिसा बजावण्याचा आदेश महापालिका आयुक्त शंकर गोरे यांनी मंगळवारी दिला आहे.

महापालिका आयुक्त शंकर गोरे यांनी शहरातील गाई-म्हशींच्या गोठ्याचा आढावा घेतला. शहरातील सावेडी, केडगाव, झेंडीगेट व इतर ठिकाणी आणि सगळे मिळून तब्बल 466 गोठे आहेत. या गोठ्याचे मालक ही जनावरे रस्त्यावर आणतात. कित्येकदा शहरातच सकाळी जनावरे सोडून संध्याकाळी घरी घेऊन जातात मात्र त्यामुळे दिवसभर शहरात नागरिकांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागते. जनावरे मध्येच बसलेली असल्याने अपघात देखील होतात त्यामुळे महापालिका आयुक्तांनी हे मोठे स्वागतार्ह पाऊल उचलले आहे मात्र यापुढे जाऊन देखील कारवाई होणार की निव्वळ नोटिसा बजावून कर्मचारी परत फिरणार हे आता येत्या काळात पाहावे लागेल .

गोठ्यांसाठी परवानगी घेतली आहे किंवा नाही याची माहिती मालकांकडून घेण्यात येणार आहे. ही माहिती आल्यानंतर अनधिकृत गोठ्यांबाबत धोरण ठरवले जाईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. शहरासह उपनगरात देखील मोकाट ( म्हणजे दिवसभरासाठी मालकांनी सोडलेले ) जनावरांचा प्रश्न गंभीर बनला असून महापालिकेच्या कोंडवाडा विभागाकडून मोकाट जनावरांवर कारवाई केली जाते, त्यावर देखील महापालिकेचे लाखो रुपये खर्च होतात मात्र तरीदेखील गोठ्याचे मालक बेशिस्तपणे जनावरे रस्त्यावर सोडून देतात.

नागरिकांच्या जिवाशी हा एक प्रकारे खेळ असून या गोठे मालकांवर कठोर कारवाईची मागणी नगरकर कित्येक दिवसापासून करत आहे मात्र तरीदेखील जुजबी कारवाई वगळता काहीही मोठी धडाकेबाज कारवाई गेल्या कित्येक वर्षात झाल्याचे स्मरणात नाही. आयुक्तांचा हा निर्णय कुठवर तडीस नेला जातो कि लोकप्रतिनिधीमध्ये लुडबुड करून आयुक्तांना कारवाईपासून रोखतात, ते आता स्पष्ट होणार आहे.