‘अर्धेच काय संपूर्ण मंत्रिमंडळ तुरुंगात टाका, आम्ही घाबरत नाही ’, राष्ट्र्रवादीकडून जोरदार पलटवार

शेअर करा

केंद्र सरकारकडून तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात असल्याचा गंभीर आरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलाय. त्याला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही प्रत्युत्तर दिलं. तपास यंत्रणाचा गैरवापार केला असता तर अर्धे मंत्रिमंडळ तुरुंगात असते, असं फडणवीस म्हणाले. फडणवीसांच्या या वक्तव्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी फडणवीसांना आव्हान दिलंय. ‘अर्धे काय पूर्ण टाका ना मंत्रीमंडळ तुरुंगात…आम्ही कुणाला घाबरणार नाही’, असा स्पष्ट इशारा नवाब मलिक यांनी फडणवीसांना दिलाय.

सत्तेचा गैरवापर करायचा असेल तर तुम्ही कितीही लोकांना तुरुंगात टाकू शकता परंतु आम्ही घाबरणार नाही. भ्रष्टाचाराचे आरोप करत असताना त्यांनी सावधपणे आरोप केले पाहिजे असे सांगतानाच ‘सौ चुहे खाके बिल्ली हज को चली’ असा टोलाही नवाब मलिक यांनी लगावला. दरम्यान बरेचसे उंदीर आम्ही काही दिवसातच बाहेर काढू, असा सूचक इशाराही मलिक यांनी फडणवीस आणि भाजपला दिलाय.

इंग्रजांच्या जुलमी अत्याचाराच्या विरोधात लाल-बाल-पाल यांनी क्रांती केली तीच क्रांती भाजपप्रणीत केंद्रसरकारच्या विरोधात महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि पंजाब या तीन राज्यातून उभी राहिल असा विश्वासही मलिकांनी व्यक्त केलाय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात लाल-बाल-पाल या तीन क्रांतीकारकांचा उल्लेख केला होता. त्यावर बोलताना मलिक यांनी भाजपचे हे जुलमी सरकार उलथवायला ही तीन राज्ये कारणीभूत ठरणार आहेत असं स्पष्ट केलं.

राज्याचे अधिकार जिथे विरोधकांचे सरकार आहे तिथे केंद्रसरकार यंत्रणेचा वापर करून खोट्या केसेस बनवून बदनाम केले जात आहे. जे सनदी अधिकारी आहेत ज्यांचा पीएमओमधून कंट्रोल असतो त्या अधिकार्‍यांवर दबाव आणून सरकारला अडचणीत आणण्याचा खेळखंडोबा हा देशभर सुरू आहे. विशेष करुन पश्चिम बंगाल व महाराष्ट्रात असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.


शेअर करा