नगर महापालिकेतील अधिकारी ‘ असा ‘ आला जाळ्यात, मनपाच्या टक्केवारी रॅकेटचा पर्दाफाश होणार का ?

शेअर करा

नगर महापालिकेतील सावळ्या गोंधळाबद्दल नगर चौफ़ेरने अनेक वेळा वृत्त प्रकाशित केले आहे, अशातच नगर महापालिकेतून एक धक्कादायक बातमी समोर आली असून महापालिकेतील मुख्य लेखाधिकारी प्रवीण मानकर याच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी थकलेली बिले मिळावेत म्हणून ठेकेदारांनी आंदोलन देखील केले होते. आत्ताची कारवाई ही एका ठेकेदाराचे कामाचे बिल काढण्यासाठी मानकर याने त्याच्याकडे वीस हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती, या संदर्भात आहे.

तक्रारदार आणि त्यांचे मावसभाऊ हे महापालिकेत ठेकेदार म्हणून काम करतात, अशाच एका कामात संदर्भातील पैसे महापालिकेकडून मिळावेत म्हणून त्यांचा पाठपुरावा सुरू होता. त्या कामाची बिले मंजूर करून डिमांड ड्राफ्ट काढून पैसे देण्याच्या मोबदल्यात मुख्य लेखाधिकारी प्रवीण गोपाळराव मानकर ( वय 52 मानकर गल्ली ) याने तक्रारदार यांच्याकडे 20 हजार रुपयांची मागणी केली होती. आधीच बिले मिळण्यात होत असलेला उशीर आणि आणि त्यात महापालिका अधिकाऱ्यांचे हात ओले केल्याशिवाय निघत नसलेली बिले यामुळे तक्रारदार हतबल झालेला होता.

तक्रारदाराने तात्काळ सदर प्रकाराबद्दल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर या तक्रारीची लाचलुचपत विभागाकडून पडताळणी करण्यात आली. त्यात मानकर याने त्याच दिवशी 15000 स्वीकारण्याची संमती दर्शवली. त्यानंतर बुधवारी 20 तारखेला मानकर याच्याविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्याला ताब्यात घेण्यात आले. महापालिकेतील बिले काढण्यासाठी पैसे मागणारा मानकर हा नक्की स्वतःसाठी पैसे घेत होता की त्याला इतरही काही पार्टनर आहेत याचा तपास सुरू आहे आहे, मात्र या धडाडीच्या कारवाईमुळे महापालिका अधिकाऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.

महापालिका आयुक्त शंकर गोरे नेमके नेमके याच वेळी ठेकेदारांची बैठक त्यांच्या दालनांमध्ये घेत होते. सदर बैठक सुरू असतानाच अचानक मानकर याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे वृत्त आयुक्तांपर्यंत येऊन धडकले आणि आयुक्तांना देखील चांगलाच घाम फुटला. ठेकेदारांच्या समोर फोनवर न बोलता बाहेर येत आयुक्तांचे बराच काळ संभाषण सुरु होते. फोनवर बोलून झाल्यानंतर आयुक्त शंकर गोरे यांनीदेखील ठेकेदार यांसोबतची बैठक तात्काळ आटोपती घेतली.

काही महिन्यांपूर्वीच महापालिकेतील थकित बिले निघत नाहीत यासाठी ठेकेदारांनी महापालिकेसमोर उपोषण देखील केले होते. महापालिका अधिकाऱ्यांना लक्ष्मीचे दर्शन घडवल्याशिवाय आमची बिले निघत नाहीत, अशी ठेकेदारांची अनेक दिवसांपासूनची तक्रार आहे मात्र आयुक्तांचे बोटचेपे धोरण हे ठेकेदार यांच्या आणि कथित टक्केवारी मुळे होत असलेल्या जुजबी कामांमुळे नगरकरांच्या मुळावर उठत आहे. धरले गेलेले अधिकारी हे देखील मोठ्या हुद्यावर कार्यरत असून अद्यापही ह्या रॅकेटची पाळेमुळे उखडण्यात प्रशासनाला यश आलेले नाही.

महापालिका निधी व शासकीय निधी अशी निधीची वर्गवारी करण्यात आलेली आहे. शासकीय निधीला महापालिकेत रोख निधी असे म्हटले जाते, या निधीतील बिल काढण्याचे दर हे इतर कामापेक्षा जास्त आहेत तसेच सर्वाधिक निधी हा स्वच्छता आणि आरोग्य विभागातच येतो. याआधी आरोग्य अधिकारी डॉक्टर नरसिंह पैठणकर हा देखील पैसे घेताना पकडला गेला होता. या घटनेला दोन वर्षे पूर्ण झाली मात्र तरी देखील महापालिकेतील अधिकारी या प्रकरणानंतरही कोणताच धडा घेत नसल्याचे दिसून आले आहे .

ठेकेदारांचे सोडा पण सर्वसामान्य नागरिकांना देखील महापालिकेत पैशांसाठी अक्षरश: नागवले जाते. कित्येक हेलपाटे मारून देखील महापालिका अधिकारी दाद देत नाही आणि प्रकरण कोर्टापर्यंत गेले हे प्रकरण कोर्टात आहे, असे सांगून महापालिका अधिकारी ‘ आम्ही काय ते कोर्टात सांगू ‘ असे सांगून हात झटकत आहेत. आयुक्त शंकर गोरे यांनी अत्यंत कठोर अशी भूमिका घेण्याची गरज असताना ते बोटचेपे धोरण का अवलंबत आहेत ? हा प्रश्न नगरकरांना भेडसावत असून आयुक्त यांनी नागरिकांच्या असंतोषची आणखी वाट पाहू नये अशी अपेक्षा नगरकर करत आहेत.


शेअर करा