‘ बायको अवदसा म्हणून तुला मंत्रिपद नाही ‘, पुण्यात गाजलेल्या प्रकरणात ‘ मोठी घडामोड ‘

शेअर करा

पुणे शहरात आध्यात्मिक गुरूच्या सांगण्यावरून अघोरी कृत्य तसेच पत्नीला सिगारेटचे चटके देऊन शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणात आरोपी गणेश नानासाहेब गायकवाड याला सोमवारी (ता. २६) अटक करण्यात आली आहे. त्याच्या विरोधात पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. उच्चभ्रू कुटुंबातील घरगुती हिंसाचाराच्या या प्रकरणाने पैसे आणि ज्ञान असून देखील लोक डोके गहाण ठेवल्याने कुठल्या थराला जाऊ शकतात हे देखील समोर आले आहे .

गणेश गायकवाड याच्या २७ वर्षीय पत्नीने सासरच्या व्यक्तींच्या विरोधात फिर्याद दिलेली आहे. गणेश गायकवाड, त्याचे वडील नानासाहेब गायकवाड, आई नंदा गायकवाड यांच्यासह एकूण नऊ जणांवर कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा, हुंडा प्रतिबंधक कायदा, नरबळी व इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायद्यासह भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सासरच्या मंडळींनी पत्नीला सिगारेटचे चटके दिले तसेच पतीने केलेल्या मारहाणीत फिर्यादी यांचा एक कान कायमस्वरूपी बहिरा झाला. आरोपीने फिर्यादी यांचा पासपोर्ट, पॅनकार्ड, शैक्षणिक कागदपत्रे, दागिने, लग्नात दिलेली चांदीची भांडी, देवपूजेचे साहित्य लपवून ठेवले तसेच आध्यात्मिक गुरूच्या सांगण्यावरून फिर्यादी यांच्यावरून लिंबू उतरविण्याचे अघोरी कृत्य केले. पुढील तपासासाठी आरोपीला पाच दिवस पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी केली होती न्यायालयाने ती मान्य करीत गायकवाडला २८ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.

काय आहे प्रकरण ?

“तुझी बायको पांढऱ्या पायाची आहे, तिची जन्मवेळ चुकीची असून तिचे ग्रहमान दूषित झाले आहे. जर ही तुझी बायको म्हणून कायम राहिली, तर तू मंत्री काय, आमदारही होणार नाहीस, तिला लवकरात लवकर सोडचिठ्ठी दे आणि तुझा मुलगा तिच्याकडून काढून घे ” असा सल्ला गायकवाड कुटुंबाला रघुनाथ येंमुल या राजकीय गुरुने दिला होता त्यानंतर पीडित महिलेचा छळ सुरु झाला आणि तिला घरातून काढून देण्यासाठी सासरच्या मंडळींनी प्रयत्न सुरु केले. जानेवारी 2017 पासून तिला त्रास दिला जात होता, ” असे पीडितेचे म्हणणे आहे.

उच्चशिक्षित सुनेला सिगारेटचे चटके, बहिरेपणा येईपर्यंत अमानुष मारहाण केल्या प्रकरणी कुटुंबातील तिघांसह एकूण आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपींमध्ये येमुलचाही समावेश होता. रघुनाथ येमुल हा मोठा राजकीय गुरु असल्याची माहिती आहे. प्रतिष्ठित कुटुंबाला सुनेचा छळ करण्यास प्रवृत्त केल्या प्रकरणी चतुःश्रृंगी पोलिसांनी येमूल यास अटक केली होती. रघुनाथ येंमुल याच्या अटकेने राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली अन अशाच पद्धतीने त्याने इतरही काही नेत्यांची डोकी भडकावली आहेत का ? याचा देखील तपास पोलीस करत आहेत.


शेअर करा