नगर हादरले ..’ नवरीसहीत डुप्लिकेट मैत्रिणींचे मॅरेज रॅकेट आले ‘ मात्र त्यानंतर ..

शेअर करा

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आर्थिक परिस्थिती खालावलेली असलेल्या कुटुंबातील मुलांना मुली मिळत नसल्याचे चित्र आहे. याचाच फायदा घेत काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक देखील यात एजंट म्हणून काम करत आहेत, अशीच एक धक्कादायक घटना नगर जिल्ह्यात घडली असून सदर मुलाला मुलगी मिळवून देतो असे आमिष दाखवत तब्बल दोन लाखांची फसवणूक या भामट्यांनी केली आहे. नेवासा तालुक्यातील नागापूर येथे ही घटना उघडकीस आली आहे. सदर प्रकरणी सात जणांच्या विरोधात नेवासा पोलीस ठाणे इथे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंद्रभान रायभान शेजुळ ( राहणार नागापूर, नेवासा ) यांनी याबाबत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, शेजुळ त्यांच्या मुलासाठी मुलगी पहात होते मात्र अनेक प्रयत्न करून देखील काही योग जुळून येत नव्हता. त्यामुळे त्यांनी सदर समस्या ही त्यांच्या ओळखीचे असलेले लक्ष्मण मंजाबापू नवले ( राहणार वडाळा बहिरोबा तालुका नेवासा ) यांना सांगितली. त्यानंतर दोन-तीन दिवसांनी लक्ष्मण नवले यांनी ‘ मी लग्न जमवून देतो मात्र त्या बदल्यात दोन लाख रुपये द्यावे लागतील ‘, असे सांगितले.

चंद्रभान शेजुळ यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला मात्र नवले याने मुलीच्या नातेवाईकांची पूर्ण माहिती दिली नाही तसेच लग्नाच्या दिवशीच मुलीचे आई-वडील मामा व इतर नातेवाईक लग्नाला येतील. त्यांची आर्थिक परिस्थिती खराब आहे, अशी देखील माहिती दिली. आर्थिक परिस्थिती खराब असल्याने लग्न सोहळा हा घरच्या घरीच पार पाडावा लागेल असे देखील नवले याने सांगितले. फक्त मुलीचा फोटो पाहूनच शेजूळ व त्यांच्या कुटुंबीयांनी लग्नाचा निर्णय घेतला आणि रविवारी 24 तारखेला संध्याकाळी सात हा मुहूर्त ठरला.

लग्न ठरले म्हणून शेजुळ कुटुंबीय आनंदित होते. त्यानंतर लग्नासाठी नवरी मुलगी अश्विनी सचिन केदारे व तिच्या सोबत मुमताज सलीम पटेल ( राहणार औरंगाबाद ) शहनाज शेख ( राहणार औरंगाबाद ) , स्नेहा गौतम मोरे ( राहणार औरंगाबाद ) या तीन मुली तसेच मध्यस्थ लक्ष्मण नवले याच्यासह राजू देवराम साळवे ( राहणार रामेश्वर नगर परभणी ) मुनीर खान आमिर खान ( राहणार संजय गांधी नगर परभणी ) हे दोन पुरुष असे या लग्नाला आले होते.

मुलीचे नातेवाईक पाठीमागून येत आहेत लग्न लावण्यास सुरुवात करा, असे शेजुळ यांना सांगण्यात आले त्यावर त्यांनी विश्वास ठेवला. त्यानंतर नवऱ्या मुलीला चक्का हळद लावूनही तयार झाली तरीदेखील मुलीचे नातेवाईक येईनात, म्हटल्यानंतर शेजुळ यांना संशय आला त्यावर त्यांनी लक्ष्मण नवले, राजू साळवे व मुनीर खान आमिर खान यांना थोडे मांडवाच्या बाजूला घेत याविषयी विचारले असता ‘ आता गुपचूप लग्न उरकून घ्या नाही तर आमच्या सोबत आलेल्या मुलीवर तुम्ही अतिप्रसंग केला म्हणून आरडाओरडा करू. आता गुपचूप आमचे दोन लाख रुपये देऊन टाका ‘ अशी धमकी त्यांना देण्यात आली. त्यावरून लक्ष्मण मंजाबापू नवले, राजू देवराव साळवे, मुनीर खान आमिर खान व मुलीच्या मैत्रिणी म्हणून बनवलेल्या तीन मुली यांच्याविरुद्ध नेवासा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


शेअर करा